
पती घरी नसताना पत्नीने घेतला गळफास
रत्नागिरी : आजाराने त्रस्त असलेल्या ३६ वर्षीय महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मानसी महेश देसाई (रा. लावगण देसाईवाडी, देवूड, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २४) रात्री उघडकीस आली.
मानसी यांना शरीरातील प्रथिनांची कमतरता आणि त्यामुळे होणाऱ्या सूजेचा त्रास होता. त्यांच्यावर रत्नागिरीतील दोन खासगी रुग्णालयांत उपचार केल्यानंतर कोल्हापूर येथील सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. ७ नोव्हेंबरला पती त्यांना उपचारानंतर घरी घेऊन आले होते.
मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पती गावातील मंदिराचा उत्सव संपवून घरी आले. दरवाजाची कडी उघडून आत प्रवेश केल्यानंतर त्यांनी पत्नीला आवाज दिला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर घराच्या मागील पडवीत पाहिले असता मानसी यांनी ओढणीने गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र रात्री पावणेबाराच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.




