राजापूर तालुक्यातील ओणी पुलाजवळ दोन आयशर ट्रकची धडक; ट्रक जवळ उभे असलेल्या कुडाळच्या दत्तप्रसाद परुळेकर यांचा मृत्यू


राजापूर तालुक्यातील ओणी येथे दोन आयशर ट्रकच्या अपघातात कुडाळ येथील दत्तप्रसाद परुळेकर यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (९ मे) पहाटे साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास ओणी पुलाजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दत्तप्रसाद परुळेकर हे आपल्या सहकारी वीरेंद्र सावंत यांच्यासोबत आयशर ट्रकमधून मुंबई येथे आंब्याची वाहतूक करून परत सिंधुदुर्गकडे जात होते. ओणी पुलाजवळ त्यांनी लघुशंकेसाठी इंडिकेटर देऊन ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवला होता. त्यावेळी मुंबईहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या आयशर ट्रकने (चालक – गोविंद कांबळी, रा. शिरोळा, जि. सिंधुदुर्ग) थांबलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली.

या धडकेत ट्रकजवळ उभे असलेले दत्तप्रसाद परुळेकर यांना जबर मार लागून ते फरपटत पुढे गेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या समवेत असलेले वीरेंद्र सावंत हे मात्र सुदैवाने बचावले असून त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. अपघातानंतर दत्तप्रसाद परुळेकर यांना पुढील उपचारासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिस निरीक्षक अमित यादव, पोलिस शिपाई नरेश गुरव, नितीन घोगले, पोलिस हवालदार प्रसाद शिवलकर आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा व मदतकार्य केले. या अपघाताचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अमित यादव करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button