रंगरेषांच्या माध्यमातून उलगडले ‘बालहक्कांचे’ धडे बाल अधिकार सप्ताहानिमित्त रत्नागिरीतील घुढेवठार परिसरात चित्रकला स्पर्धेचे आयोजन; १०९८ हेल्पलाइनबाबत जनजागृती


रत्नागिरी, दि. १८ ): बालदिनाचे औचित्य साधून रत्नागिरीतील घुढेवठार परिसरातील बालकांसाठी चित्रकला स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. संयुक्त राष्ट्र संघाच्या बालहक्क संहितेला ३६ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात १४ ते २० नोव्हेंबर २०२६ दरम्यान ‘बाल अधिकार सप्ताह’ साजरा केला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून चिमुकल्यांना केवळ चित्रकलेचे व्यासपीठच मिळाले नाही, तर त्यांच्या मूलभूत हक्कांचीही सविस्तर माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमात बालकांना जगण्याचा, विकासाचा, संरक्षणाचा आणि सहभागाचा अधिकार या चार मुख्य स्तंभांविषयी अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच बालकामगार प्रथा, बालभिक्षावृत्ती, बालविवाह आणि बाल अत्याचार यांसारख्या गंभीर सामाजिक समस्यांविषयी मुलांमध्ये जनजागृती करण्यात आली.
संकटकाळी मदतीचा हात : ‘चाइल्ड हेल्पलाइन १०९८’
संकटात सापडलेल्या, हरवलेल्या किंवा असुरक्षित बालकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी २४ तास उपलब्ध असलेल्या मोफत ‘चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८’ ची माहिती मुलांना देण्यात आली. या क्रमांकावर संपर्क साधून स्वतःचे आणि इतर बालकांचे संरक्षण कसे करावे, याचे महत्त्वही त्यांना पटवून देण्यात आले.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. यावेळी चाइल्ड हेल्पलाइन सुपरवायझर ऐश्वर्या लाड आणि केस वर्कर प्राजक्ता कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button