
कोकाकोला कंपनीची संरक्षक भिंत कोसळली!
परतीच्या पावसाचा दणका की सांडपाणी साचल्याचा परिणाम?; पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून गंभीर आरोप
खेड : लोटे अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमधील कोकाकोला कंपनीची संरक्षक भिंत मंगळवारी, दि. २९ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक कोसळली. खेड तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असतानाच ही घटना घडल्याने मुसळधार पावसामुळेच संरक्षक भिंत कोसळली का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी यामागे कंपनी परिसरात साचलेले सांडपाणी कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोकाकोला कंपनीच्या परिसरातून संरक्षक भिंतीच्या बाहेर सोडले जाणारे सांडपाणी काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून याबाबत कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावून सांडपाणी बाहेर सोडणे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
ग्रामस्थांच्या आरोपानुसार, संरक्षक भिंतीच्या बाहेर जाणारे सांडपाण्याचे मार्ग बंद करण्यात आल्यानंतर कंपनी परिसरातील सांडपाणी आतमध्येच साचून राहिले. त्यातच गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या साचलेल्या पाण्याच्या प्रमाणात आणखी वाढ झाली.
सांडपाणी आणि पावसाचे पाणी संरक्षक भिंतीला लागून साचल्याने भिंतीवर अतिरिक्त दबाव निर्माण झाला आणि परिणामी संरक्षक भिंत कोसळली, असा दावा पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात परतीच्या पावसाने अनेक भागात जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. लोटे परिसरातही पावसाचा जोर होता. त्यामुळे संरक्षक भिंत कोसळण्यामागे अतिवृष्टी हे कारण आहे का, की परिसरात साचलेल्या पाण्यामुळे भिंतीवर अतिरिक्त ताण निर्माण झाला, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.
कोकाकोला कंपनीच्या परिसरातील सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न यापूर्वीही चर्चेत राहिला असल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटनेनंतर या प्रकरणाला पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
मात्र, संरक्षक भिंत नेमक्या कोणत्या कारणामुळे कोसळली, याबाबत सध्या अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. परतीच्या पावसाचा परिणाम, सांडपाणी साचल्यामुळे निर्माण झालेला दबाव किंवा अन्य तांत्रिक कारण यापैकी नेमके कारण कोणते, याची संबंधित यंत्रणांकडून पाहणी व तांत्रिक तपासणी झाल्यानंतरच स्पष्टता येणार आहे.
दरम्यान, या घटनेची संबंधित विभागांकडून लवकरच पाहणी होऊन संरक्षक भिंत कोसळण्यामागील नेमक्या कारणांची कारणमीमांसा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.




