
विलवडे रेल्वे स्थानकावर सुपरफास्ट गाड्यांनाही थांबा मिळणार!
आमदार किरण सामंत यांची महत्त्वपूर्ण घोषणा; एकाच दिवसात सहा रेल्वे स्थानकांची पाहणी, सहा महिन्यांत समस्या सोडविण्याचा निर्धार
लांजा : कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या लांजा आणि राजापूर तालुक्यातील प्रवाशांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. एकाच दिवसात तब्बल सहा रेल्वे स्थानकांना भेटी देत त्यांनी प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. या दौऱ्यात विलवडे रेल्वे स्थानकावर यापुढे सुपरफास्ट रेल्वे गाड्यांनाही थांबा मिळणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी केली. तसेच प्रवाशांच्या विविध समस्या आणि प्रलंबित कामे पुढील सहा महिन्यांत मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
आमदार किरण सामंत यांनी निवसर, आडवली, वेरवली, विलवडे, सौंदळ आणि राजापूर रोड या सहा रेल्वे स्थानकांचा दौरा करून तेथील सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी प्रत्येक स्थानकावर स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी आपल्या अडचणी, समस्या तसेच प्रलंबित मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. आमदार सामंत यांनी प्रवाशांचे म्हणणे सविस्तर ऐकून घेत प्रत्येक समस्येची स्वतः नोंद करून घेतली.
या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे विविध शासकीय विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही सोबत घेण्यात आले होते. यामध्ये कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, एसटी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग तसेच महावितरणच्या प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यामुळे नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमोरच चर्चा करून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले.
सहा महिन्यांत प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार
लांजा आणि राजापूर तालुक्यातील रेल्वे प्रवाशांच्या अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. स्थानकांवरील मूलभूत सुविधा, प्रवाशांची गैरसोय आणि विविध विभागांशी संबंधित प्रश्न यांचा या दौऱ्यात आढावा घेण्यात आला. ही सर्व कामे पुढील सहा महिन्यांत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आमदार सामंत यांनी स्पष्ट केले. विलवडे रेल्वे स्थानकावर सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना थांबा मिळणार असल्याच्या घोषणेमुळे परिसरातील प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रश्न सोडविण्याची भूमिका
केवळ आश्वासने देण्याऐवजी नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन जाणून घेणे आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून त्यावर उपाययोजना करून घेणे, अशी भूमिका आमदार सामंत यांनी या दौऱ्यातून स्पष्ट केली. त्यामुळे लांजा आणि राजापूर तालुक्यातील रेल्वे प्रवाशांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या दौऱ्यात सभापती मानसी आंबेकर, शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, लांजा नगराध्यक्षा सावली कुरूप यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार किरण सामंत यांच्या या पाहणी दौऱ्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांबाबत आशादायी वातावरण निर्माण झाले असून, जाहीर करण्यात आलेल्या उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते, याकडे आता लांजा आणि राजापूर तालुक्यातील प्रवाशांचे लक्ष लागले आहे.




