
नगरपरिषदेच्या ठेवी मोडण्याची वेळ का आली? ग्रॅव्हिटी पाणी योजनेचा भास्कर जाधव यांनी घेतला आढावा
१५२ कोटींच्या योजनेसाठी आतापर्यंत केवळ ४५ कोटींचा निधी प्राप्त; वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत अडचणी सोडविण्याचे आश्वासन
चिपळूण : कोळकेवाडी धरणातून गुरुत्वाकर्षण शक्तीच्या (ग्रॅव्हिटी) माध्यमातून चिपळूण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या रखडलेल्या कामाचा आमदार भास्कर जाधव यांनी बुधवारी (दि. १८) आढावा घेतला. या योजनेसाठी शासनाकडून अपेक्षित निधी मिळत नसल्याने चिपळूण नगरपरिषदेवर स्वतःच्या ठेवी मोडून पाच कोटी रुपये खर्च करण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर जाधव यांनी संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
नगरोत्थान योजनेअंतर्गत २०२४ मध्ये मंजूर झालेल्या या पाणी योजनेची किंमत १५२ कोटी रुपये आहे. मात्र, आतापर्यंत शासनाकडून केवळ ४५ कोटी रुपये प्राप्त झाले असून, त्याच प्रमाणात काम पूर्ण झाले आहे. सध्या चिपळूण शहराला कोयना धरणातील अवजलातून पाणीपुरवठा होत असला, तरी भविष्यातील पाण्याची गरज आणि संभाव्य संकट लक्षात घेता कोळकेवाडी धरणातून थेट ग्रॅव्हिटीने पाणी आणणे आवश्यक आहे.
नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या सभेत ठेवींमधून पाच कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय झाल्याचे समजल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी या प्रश्नात लक्ष घातले. त्यांनी आपल्या कार्यालयात कोळकेवाडी धरण व्यवस्थापन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि नगरपरिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
या बैठकीत योजनेचा इतिहास आणि सद्यस्थिती जाणून घेताना विविध विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कोयना सिंचन विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि चिपळूण नगरपरिषद यांच्यात समन्वय साधून योजनेतील अडचणी दूर करणे आपल्यासाठी अवघड नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच चिपळूण तालुका डोंगरी विकास क्षेत्रात समाविष्ट असल्याने योजनेसाठी १० टक्के लोकवर्गणी भरण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
या योजनेत चिपळूण शहरासोबतच २७ गावांचा समावेश व्हावा, यासाठी तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे आपण पाठपुरावा केला होता. त्यातून सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात यश आल्याची माहितीही जाधव यांनी दिली.
या बैठकीला कोळकेवाडी धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता महेश रासणकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता योगेश नंजाप्पा, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजित कांबळे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय जाधव यांच्यासह नगरसेवक फैसल कास्कर, मिथिलेश ऊर्फ विकी नरळकर, कांचन शिंदे, अजय भालेकर आदी उपस्थित होते.
शहराच्या भविष्यातील पाणीप्रश्नाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या योजनेला गती देण्यासाठी आमदार जाधव यांनी पुढाकार घेतल्याने आता शासनाकडून उर्वरित निधी कधी उपलब्ध होतो आणि योजना प्रत्यक्षात कधी पूर्ण होते, याकडे चिपळूणकरांचे लक्ष लागले आहे.




