
पंढरपूर वारीला रत्नागिरी जिल्ह्यातून १६६ बसेसचे नियोजन
रत्नागिरी : पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीनिमित्त भरणाऱ्या वारीला रत्नागिरी जिल्ह्यातून १६६ एसटी बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. वारकरी, भाविक या एसटीमधून पंढरपूरला रवाना होणार आहेत. १४ नोव्हेंबरपासून या बसेस विविध बसस्थानकातून एसटी बसेस पंढरपूरला रवाना झाल्या आहेत.
आषाढी वारीनंतर कार्तिकी वारीला मोठे महत्त्व असते. लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरीला येत असतात. येत्या २१ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. आतापासूनच वारकरी पंढरीत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी कोणी पायी, तर कोणी लालपरीचा आधार घेत पंढरपूर गाठतात. वारकरी, भाविकांचा प्रवास चांगला, सुखकर होण्यासाठी रत्नागिरी विभागातून जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरी विभागातून १६६ एसटी बसेसचे आरक्षण झाले आहे. १४ ते १६ नोव्हेंबर या काळात विविध आगारातून बसेस पंढरपूरला रवाना झाल्या आहेत. विठुनामाचा गजर करीत वारकरी, भक्त पंढरीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. काही जण खासगी बसेस, चारचाकीने रवाना होत आहेत. लांजा, दापोली, रत्नागिरीसह इतर तालुक्यातून काही वारकरी पायी पंढरपूरला जात आहेत. एकादशीनंतर परतीचा प्रवास होवून सर्व बसेस रत्नागिरीत येतील असेही सांगण्यात आले. काही जणांनी ग्रुप बुकींग केले आहे.
यंदाही महिला, ६५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना तिकीटात ५० टक्के सवलत तर ७५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे. रत्नागिरी विभागातील लांजा, राजापूर, गुहागर, चिपळूण, देवरूख, खेड, दापोली, रत्नागिरीसह विविध आगारातून एसटी बसेसचे बुकींग झाले आहे. मागील वर्षी १६२ एसटी गाड्या रवाना झाल्या होत्या.




