चिपळूणच्या दोन्ही बसस्थानकांच्या रखडलेल्या कामांना मिळणार गती!

आमदार शेखर निकम यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी भेट; एसटी महामंडळाच्या एमडींना तातडीने कार्यवाहीचे निर्देश

चिपळूण : चिपळूण शहरातील मध्यवर्ती बसस्थानक आणि शिवाजीनगर बसस्थानकाच्या रखडलेल्या विकासकामांना आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासकीय मान्यता मिळूनही निविदा प्रक्रियेमुळे रखडलेल्या या कामांचा प्रश्न आमदार शेखर निकम यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निदर्शनास आणून दिला. यावेळी परिवहन मंत्र्यांनी एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना (एमडी) तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

चिपळूणचे मध्यवर्ती बसस्थानक हे कोकणातील महत्त्वाचे आणि वर्दळीचे बसस्थानक असून, दररोज हजारो प्रवासी येथून प्रवास करतात. या बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम दोन टप्प्यांत नियोजित आहे. पहिल्या टप्प्यात २ कोटी ८७ लाख रुपयांच्या निधीतून रस्ते, बाह्य शेड आणि अन्य संरचनात्मक कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील २ कोटी ३० लाख रुपयांच्या निधीतून होणारी फरशी, रंगरंगोटी, विद्युत व्यवस्था, सुशोभीकरण आणि अन्य कामांची निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे उर्वरित कामांना विलंब होत आहे.

दुसरीकडे, शिवाजीनगर बसस्थानकाची अवस्थाही दयनीय झाली आहे. मुंबई, पुणे आणि कोल्हापूरसारख्या प्रमुख शहरांसाठी एसटी बसेसची ये-जा असलेल्या या बसस्थानकात स्वच्छतागृहांची दुरवस्था, अपुरी आसनव्यवस्था, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, अस्वच्छ बाकडे, मोकाट जनावरांचा वावर आणि वाढलेली झाडेझुडपे अशा समस्यांनी प्रवासी त्रस्त आहेत. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

शिवाजीनगर बसस्थानकाच्या विकासासाठी आमदार शेखर निकम यांनी यापूर्वीच ३ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. या कामाला १३ जानेवारी २०२६ रोजी प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. मात्र, त्यानंतरही निविदा प्रक्रिया पुढे न गेल्याने विकासकामे रखडली आहेत.

या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन दोन्ही बसस्थानकांच्या कामांमधील प्रशासकीय अडथळे दूर करून निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. त्याची दखल घेत मंत्र्यांनी एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे चिपळूणमधील दोन्ही बसस्थानकांच्या विकासकामांना आता प्रत्यक्ष सुरुवात होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button