
राजापूर शहरात एक कोटींचे ‘नमो उद्यान’ साकार होणार! शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी मंजूर;
१९ नोव्हेंबरला आमदार किरण सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन
राजापूर : शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासोबतच नागरिकांना विरंगुळा, मनोरंजन आणि निवांत वेळ घालवण्यासाठी एक सुंदर ठिकाण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राजापूर नगरपरिषदेच्या वतीने शहरात ‘नमो उद्यान’ विकसित करण्यात येणार आहे. शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी या उद्यानाच्या उभारणीकरिता एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता साई मंदिराजवळील नगर वाचनालयाच्या मागील बाजूस होणार आहे. आमदार किरण उर्फ भैय्या सामंत आणि राजापूर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
राजापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जात आहे. शहरात नागरिकांसाठी दर्जेदार विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध व्हावे, तसेच शहराच्या सौंदर्यातही भर पडावी, या दृष्टीने ‘नमो उद्यान’ प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. या उद्यानामुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक आणि शहरवासीयांना मनोरंजन व विरंगुळ्यासाठी एक हक्काचे ठिकाण उपलब्ध होणार आहे.
या भूमिपूजन सोहळ्याला राजापूर शहरातील नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजापूर नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.




