
नृत्यार्पण नृत्य अकादमीच्या विद्यार्थिनींचे राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत घवघवीत यश; ९ जणींची पुरस्कारांवर मोहोर!

रत्नागिरी : सहाव्या ऑल इंडिया कल्चरल ऑलिम्पियाड कॉन्टेस्ट २०२६ या राष्ट्रीय सांस्कृतिक स्पर्धेत रत्नागिरीच्या नृत्यार्पण नृत्य अकादमीच्या विद्यार्थिनींनी भरतनाट्यम नृत्य प्रकारात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत अकादमीच्या नऊ विद्यार्थिनींनी विविध गटांमध्ये तृतीय आणि चतुर्थ क्रमांक पटकावत रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तर अकादमीच्या मार्गदर्शक आणि नृत्यगुरू प्रणाली तोडणकर-धुळप यांना विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
श्री हरी निकेतन नागपूर आणि स्वरमये नृत्य निकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत देशभरातून एकूण १३५ स्पर्धक सहभागी झाले होते. पुणे येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात ही स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेत सब ज्युनिअर गटात आरवी लोंढे हिने तृतीय, तर स्पृहा भाटकर हिने चतुर्थ क्रमांक मिळवला. ज्युनिअर गटात ओवी साळवी हिने तृतीय क्रमांक पटकावला. सीनियर गटात अनव्या आंबडे आणि भक्ती जोशी यांनी तृतीय, तर भूमिका गुरव आणि श्रुजेश्वरी आवळकर यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला. ओपन गटात श्रुती किल्लेकर आणि हर्षिता मुळे यांनी तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केले.
दरम्यान, नृत्यार्पण नृत्य अकादमीच्या मार्गदर्शक आणि नृत्यगुरू प्रणाली तोडणकर-धुळप यांना ओपन फेस्टिव्हल विभागात ‘नृत्यकला शिरोमणी पुरस्कार’ आणि ‘नृत्यकला गुरुआचार्य पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
या सर्व यशस्वी विद्यार्थिनींना प्रणाली तोडणकर यांनी भरतनाट्यम नृत्याचे मार्गदर्शन केले. त्यांच्या मेहनतीला आणि सातत्यपूर्ण सरावाला या यशाच्या माध्यमातून मोठे यश मिळाले आहे.
नृत्यार्पण नृत्य अकादमीच्या या यशाबद्दल नृत्यप्रेमी आणि कलाक्षेत्रातून विद्यार्थिनींसह त्यांच्या गुरूंचे अभिनंदन होत आहे.



