
लोकलमधील वादात फेकलेला चाकू निष्पाप प्रवाशाला लागला

मुंबई : विरार-चर्चगेट फास्ट लोकलमध्ये दोन प्रवाशांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर चाकूहल्ल्यात झाले. एका प्रवाशाने दुसऱ्यावर फेकलेला चाकू लक्ष्य चुकल्याने एका निष्पाप प्रवाशाला लागून तो जखमी झाला. ही घटना रविवारी अंधेरी स्थानकातून ट्रेन सुटल्यानंतर घडली.
अंधेरी स्थानकातून विरारच्या दिशेने लोकल सुटल्यानंतर दोन व्यक्तींमध्ये जोरदार वाद सुरू झाला. वाद वाढल्यानंतर त्यातील एका व्यक्तीने दुसऱ्यावर चाकू फेकला. मात्र, फेकलेला चाकू लक्ष्याला न लागता 53 वर्षीय सुरेश शर्मा यांना लागला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे लोकलमधील प्रवाशांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली.
जखमी शर्मांना तत्काळ मदत मिळावी यासाठी प्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढून लोकल थांबवली. ट्रेन बांद्रा स्थानकात थांबल्यानंतर जखमी सुरेश शर्मा यांना प्रथमोपचार देण्यात आला. त्यानंतर त्यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
या घटनेप्रकरणी पोलिसांनी नाशिक येथील 25 वर्षीय शिवा गायकवाड याला ताब्यात घेतले आहे. लोकलमध्ये चाकू फेकण्यामागील नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस करीत आहेत.




