चिपळूण वन विभागाची धाडसी कामगिरी! ४० फूट खोल विहिरीत पडलेल्या दुर्मिळ काळ्या बिबट्याची सुखरूप सुटका

चिपळूण : तालुक्यातील मौजे उमरोली येथील भडवळकरवाडी येथे विष्णू अर्जुन भडवळकर यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये दुर्मिळ काळा बिबट्या (Black Panther) पडल्याची माहिती आज (१७ नोव्हेंबर) सकाळी ग्रामपंचायत सदस्य योगेश खांडेकर यांनी वनरक्षक राहुल गुंठे यांना दिली.
घटनेची माहिती मिळताच चिपळूणचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे अधिकारी व बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये चिपळूणचे वनपाल एस. एस. सावंत, कोळकेवाडीचे वनरक्षक कृष्णा इरमले, रामपूरचे वनरक्षक राहुल गुंठे, बचाव पथकातील अजय बडदे, अथर्व घाग, वाहनचालक नंदकुमार कदम तसेच शहेनशहा कलावंत, लिपिक यांचा समावेश होता.
घटनास्थळाची पाहणी केली असता ही विहीर लोकवस्तीपासून सुमारे ४०० ते ५०० मीटर अंतरावर शेतामध्ये असून, विहिरीला कठडा किंवा संरक्षक बांधकाम नव्हते. सुमारे ४० फूट खोल असलेल्या या विहिरीमध्ये पाणी असून, विहीर अत्यंत अडचणीच्या ठिकाणी असल्याचे निदर्शनास आले. विहिरीतील एका दगडावर दुर्मिळ काळा बिबट्या आश्रय घेऊन बसल्याचे दिसून आले.
विहिरीची खोली, पाण्याची स्थिती आणि अरुंद जागा यामुळे हे बचावकार्य वन विभागाच्या पथकासाठी अत्यंत आव्हानात्मक होते. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वन विभागाच्या पथकाने अत्यंत संयमाने व नियोजनबद्ध पद्धतीने बचावकार्य सुरू केले. यावेळी ग्रामस्थांचे सहकार्य घेऊन विहिरीच्या परिस्थितीचा अंदाज घेत पिंजरा सावधगिरीने विहिरीमध्ये सोडण्यात आला. पिंजरा विहिरीत सोडल्यानंतर बिबट्याने पिंजऱ्यावर उडी मारली. त्यानंतर बचाव पथकाने अत्यंत कौशल्याने पिंजऱ्याची हालचाल नियंत्रित करत बिबट्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद केले. अखेर वन विभागाच्या पथकाच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि बिबट्याला कोणतीही इजा न होता विहिरीबाहेर काढण्यात आले.
विहिरीतून बाहेर काढल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी बिबट्याची पाहणी केली असता तो अंदाजे एक वर्ष वयाचा मादी काळा बिबट्या असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्याला वन विभागाच्या शासकीय वाहनातून चिपळूण येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चिकित्सालयात नेण्यात आले. तेथे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बिबट्या सुस्थितीत असल्याची खात्री झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले.
हे बचावकार्य कोल्हापूरच्या मुख्य वनसंरक्षक (प्रा.) श्रीमती श्रीलक्ष्मी, रत्नागिरी (चिपळूण) च्या विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई, तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले.
या संपूर्ण बचाव मोहिमेदरम्यान ग्रामपंचायत सदस्य योगेश खांडेकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. वन विभागाच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
वन्यजीवांचे संरक्षण, त्यांची सुरक्षित सुटका आणि मानव-वन्यजीव सहअस्तित्व जपण्यासाठी वन विभाग सदैव तत्पर आहे. नागरिकांनी वन्यप्राणी अडचणीच्या ठिकाणी आढळल्यास स्वतःहून हाताळण्याचा प्रयत्न न करता तात्काळ जवळच्या वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button