
रत्नागिरी रेल्वे स्थानकावर अखेर ‘ड्रॉप अँड गो’ सुविधा मोफत; मनमानी पार्किंग वसुलीला कोकण रेल्वेचा लगाम

रत्नागिरी, दि. 17 नोव्हेंबर 2026:
रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील पे अँड पार्किंगच्या मनमानी वसुलीविरोधात युवासेनेने पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने युवासेना जिल्हा युवाधिकारी (माजी) श्री. प्रसाद सुरेश सावंत यांच्या निवेदनाची दखल घेत लेखी आश्वासन दिले आहे.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, रत्नागिरीचे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक शैलेश दा. बापट यांनी पत्राद्वारे कळवले आहे की,
1. मोफत ‘ड्रॉप अँड गो’ सुविधा सुरू:
प्रवाशांच्या सोयीसाठी रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरात मध्ये मोफत ‘ड्रॉप अँड गो’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कालावधीत पार्किंग शुल्क आकारले जाणार नाही.
2. ठेकेदाराला सक्त ताकीद:
मनमानी शुल्क वसुलीच्या तक्रारीची दखल घेऊन संबंधित पार्किंग ठेकेदारास निर्धारित दरापेक्षा जास्त शुल्क आकारू नये व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.
3. दरफलक लावणे बंधनकारक:
पार्किंग ठेकेदाराने रेल्वे प्रशासनाने निश्चित केलेल्या शुल्काचे दरफलक लावणे बंधनकारक असून, त्याच दरानुसार शुल्क आकारणी करावी. नियमभंग झाल्यास आवश्यक ती देखरेख व कार्यवाही करण्यात येईल.
आंदोलन मागे घेण्याचे आवाहन:
रेल्वे प्रशासन योग्य ती कार्यवाही करण्यास प्रयत्नशील असून, आपण उपस्थित केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाने कारवाई केली असल्याने, जनआंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती कोकण रेल्वेने पत्रात केली आहे.
युवासेनेच्या पाठपुराव्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असून, आता प्रत्यक्षात ठेकेदाराकडून जास्त वसुली होते का, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.




