कोकणच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव! विलास ढोल्ये यांना ‘लाईफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२६’ प्रदान!!

शिवने गावातून सुरू झालेला प्रवास आंतरराष्ट्रीय औषधनिर्मिती उद्योगातील नेतृत्वापर्यंत; रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील शिवने या छोट्याशा गावात जन्मलेल्या आणि स्वकर्तृत्वाच्या जोरावर भारतीय तसेच जागतिक औषधनिर्मिती उद्योगात ठसा उमटविणाऱ्या विलास ढोल्ये यांना प्रतिष्ठेचा ‘लाईफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. एमिनन्स बिझनेस मीडिया (Eminence Business Media) यांच्या वतीने आयोजित ‘फार्मा मॅन्युफॅक्चरिंग अँड ऑटोमेशन एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६’ या सोहळ्यात २८ ऑक्टोबर २०२६ रोजी हैदराबाद येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या प्रदीर्घ व्यावसायिक कारकिर्दीचा, नेतृत्वगुणांचा आणि औषधनिर्मिती क्षेत्रातील भरीव योगदानाचा हा गौरव मानला जात आहे.

विलास ढोल्ये यांचे आई-वडील व्यवसायाने शेतकरी होते. दोघांचेही शिक्षण प्राथमिक शाळेपर्यंत झाले होते. त्यांचे वडील कै. मुरलीधर ढोल्ये ऊर्फ दादा ढोल्ये यांचा मदतीचा स्वभाव, सामाजिक कार्य आणि आधुनिक शेती व शेतीपूरक उपक्रमांमधील योगदान यामुळे परिसरात परिचित होते. तसेच त्यांनाही प्रगतीशील शेतकरी असा सन्मान मिळाला होता. अशा संस्कारक्षम वातावरणात विलास यांचे बालपण शिवने या गावात पाचवीपर्यंत गेले.

विलास ढोल्ये यांचे ज्येष्ठ बंधू विजय ढोल्ये हे देवरूख येथे वास्तव्यास असून, ते एक नामांकित सनदी लेखापाल (Chartered Accountant) म्हणून परिचित आहेत. ढोल्ये कुटुंबाने शिक्षण, व्यावसायिक गुणवत्ता आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या क्षेत्रात निर्माण केलेली ओळख निश्चितच अभिमानास्पद आहे.

सहाव्या इयत्तेपासूनच विलास यांना शिक्षणासाठी आई-वडिलांपासून दूर राहावे लागले. स्वतःच्या राहण्याची व्यवस्था, दैनंदिन गरजा आणि शिक्षणाची जबाबदारी त्यांनी लहान वयातच समर्थपणे सांभाळली. देवरूख येथील नामांकित न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी शालेय शिक्षण घेतले. तेथून अकरावीची (एस.एस.सी.) परीक्षा उत्तीर्ण होताना त्यांनी शाळेच्या गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक पटकावला.

त्यानंतर रत्नागिरी येथील गोगटे महाविद्यालयात त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. शिवाजी विद्यापीठाच्या प्री-प्रोफेशनल परीक्षेत त्यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. या गुणवत्ता यादीतील यशामुळे त्यांना मुंबई येथील प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (UDCT) या संस्थेत प्रवेश मिळाला. संपूर्ण भारतातून केवळ ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या या संस्थेत प्रवेश मिळविणे ही अत्यंत अभिमानाची बाब होती. १९७३ मध्ये त्यांनी केमिकल इंजिनिअरिंगची पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली.

त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमुळे UDCT मधील प्राध्यापकांनी त्यांना संपूर्ण शिष्यवृत्तीसह अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाण्याचा आग्रह केला होता. मात्र, परदेशात उच्च शिक्षणाची संधी असूनही त्यांनी भारतातच राहून नोकरी करणे आणि आपल्या आई-वडिलांना आधार देणे पसंत केले. त्यांच्या या निर्णयातून कुटुंबाप्रती असलेली बांधिलकी आणि सामाजिक जाणीव दिसून येते.

१९७३ पासून त्यांनी विविध उद्योगसमूहांमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत आपली कारकीर्द घडविली. घरडा केमिकल्स, एशियन पेंट्स, पिडिलाइट इंडस्ट्रीज यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी २००० पर्यंत काम केले. त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे १९८८-८९ मध्ये घरडा केमिकल्सच्या माध्यमातून लोटे परशुराम येथे कृषी रसायनांच्या उत्पादनासाठी उभारण्यात आलेला ग्रीनफिल्ड प्रकल्प. या प्रकल्पाच्या उभारणीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

या काळात त्यांनी चिपळूण, खेड आणि परिसरातील स्थानिक नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले. उद्योगाच्या विकासाबरोबरच स्थानिक समाज आणि कोकणच्या प्रगतीप्रती त्यांनी दाखविलेली बांधिलकी आजही अनेकांच्या स्मरणात आहे.

सन २००० नंतर त्यांनी औषधनिर्मिती (फार्मास्युटिकल) क्षेत्रात प्रवेश केला. पुढील सुमारे १५ वर्षे त्यांनी भारतातील दोन मोठ्या औषधनिर्मिती कंपन्यांमध्ये अत्यंत महत्त्वाच्या पदांवर काम केले. त्यामध्ये डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज आणि सिप्ला या कंपन्यांचा समावेश आहे.

डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजमध्ये त्यांनी कार्यकारी उपाध्यक्ष (Executive Vice President) तसेच व्यवस्थापन परिषदेचे सदस्य ( management council member) म्हणून जबाबदारी सांभाळली. कंपनीच्या अ‍ॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडिएंट्स (API) आणि फॉर्म्युलेशन्स उत्पादन विभागांचे व्यवस्थापन त्यांच्याकडे होते. भारत, अमेरिका आणि ब्रिटनमधील उत्पादन प्रकल्पांच्या कामकाजाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी अनेक नवीन ग्रीनफिल्ड उत्पादन प्रकल्प उभारण्यात महत्त्वाचे योगदान दिले.

त्यानंतर सिप्ला कंपनीमध्ये त्यांनी जागतिक पुरवठा साखळीचे (Global Supply Chain) व्यवस्थापन केले. जगातील सुमारे १८० देशांना औषधांचा पुरवठा करणे, उत्पादनांची विस्तृत श्रेणी हाताळणे आणि भारतासह परदेशातील ५० हून अधिक उत्पादन प्रकल्पांच्या समन्वयाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. जागतिक स्तरावरील औषधनिर्मिती आणि वितरण व्यवस्थापनातील त्यांचा अनुभव अत्यंत व्यापक आहे.

२०१५ पासून आजतागायत ते भारतातील तसेच परदेशातील अनेक औषधनिर्मिती कंपन्यांना सल्लागार आणि मार्गदर्शक म्हणून सेवा देत आहेत. उत्पादन व्यवस्थापन, औद्योगिक कार्यक्षमता, उत्पादन प्रकल्पांची उभारणी, जागतिक पुरवठा साखळी आणि मनुष्यबळ विकास या क्षेत्रांमध्ये त्यांचे मार्गदर्शन अनेक कंपन्यांसाठी उपयुक्त ठरत आहे.

अनुभव, नेतृत्व आणि पुढील पिढीला प्रेरणा देणारा गौरव
या पुरस्कारासोबत प्रदान करण्यात आलेल्या सन्मानपत्रात विलास ढोल्ये यांच्या प्रदीर्घ व्यावसायिक प्रवासाची आणि औषधनिर्मिती उद्योगातील शाश्वत योगदानाची विशेष दखल घेण्यात आली आहे.

सन्मानपत्रातील गौरवोद्गारांनुसार, औषधनिर्मिती क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय व्यावसायिक प्रवासाची आणि दीर्घकालीन योगदानाची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. नेतृत्वगुण, प्रदीर्घ औद्योगिक अनुभव आणि उत्कृष्टतेप्रती सातत्यपूर्ण बांधिलकी यांच्या जोरावर त्यांनी निर्माण केलेल्या व्यावसायिक वारसाचा हा गौरव आहे. उत्पादनाचे दर्जात्मक मानदंड उंचावणे, कुशल मनुष्यबळ घडविणे आणि औषधनिर्मिती क्षेत्रातील भावी पिढ्यांना प्रेरणा देणे या त्यांच्या योगदानाचाही सन्मानपत्रात विशेष उल्लेख आहे.

शिवने या छोट्याशा गावातून प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत, गुणवत्तेच्या जोरावर देशातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेत स्थान मिळवून, पुढे भारतातील आणि जागतिक स्तरावरील नामांकित उद्योगसमूहांमध्ये उच्च पदांवर काम करण्यापर्यंतचा विलास ढोल्ये यांचा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे.

कोकणातील स्थानिक उद्योगविकासापासून जागतिक औषधनिर्मिती क्षेत्रातील नेतृत्वापर्यंत त्यांनी गाठलेली उंची रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या या यशामुळे शिवने , संगमेश्वर आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

त्यांना मिळालेला हा जीवनगौरव पुरस्कार म्हणजे केवळ एका व्यक्तीच्या कारकिर्दीचा सन्मान नसून, गुणवत्ता, कष्ट, कुटुंबनिष्ठा, नेतृत्व आणि समाजाशी असलेली बांधिलकी यांचा गौरव आहे.

विलास ढोल्ये यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button