
गिम्हवणे येथे तुमसड माशांचा हल्ला; सहा जण जखमी!
हॉटेल न्यू पथिकजवळ दुचाकीस्वारांना माशांनी केले लक्ष्य; उपजिल्हा रुग्णालयात उपचारानंतर प्रकृती स्थिर
*दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथे तुमसड माशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात सहा जण जखमी झाल्याची घटना शनिवारी (१४ नोव्हेंबर) सकाळी घडली. हॉटेल न्यू पथिकजवळील रस्त्यावरून दुचाकीने प्रवास करणाऱ्या नागरिकांवर माशांनी एकापाठोपाठ हल्ला केल्याने परिसरात घबराट निर्माण झाली.
शनिवारी सकाळी ९ ते १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रस्त्यावरून दुचाकीने जात असलेल्या सहा प्रवाशांना अचानक तुमसड माशांनी दंश केला. या अनपेक्षित हल्ल्यात सर्व सहा जण जखमी झाले. त्यानंतर त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमींवर उपचार केले. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना २४ तास वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. रविवार (१५ नोव्हेंबर) रोजी सर्वांना घरी सोडण्यात आले. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, रस्त्यालगत असलेल्या माशांच्या पोळ्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या मार्गावरून दररोज अनेक नागरिक, दुचाकीस्वार आणि विद्यार्थी ये-जा करत असतात. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना घडू नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी या माशांचे पोळे तातडीने हटवावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे.




