कोकण रेल्वेच्या बैठकीत सकारात्मक आश्वासन; संगमेश्वरला ५ गाड्यांच्या थांब्याची शक्यता


: कोकण रेल्वेसंदर्भात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक घडामोडी घडल्या आहेत. कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोष कुमार झा यांनी स्थानिक मागण्यांबाबत सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
पद्मश्री गजानन माने यांच्या पुढाकारातून ही बैठक आयोजित करण्यात आली होती. ‘निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर’ या फेसबुक ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी CMD यांचे आभार मानले.
बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकावर ९ साप्ताहिक गाड्यांच्या थांब्याची मागणी करण्यात आली. त्यापैकी ५ गाड्यांच्या थांब्यासंदर्भात सकारात्मक प्रस्ताव लवकरच रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात येणार असून, त्यावर अनुकूल निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
तसेच, मदार जंक्शन (06014/06013) – तिरुवनंतपुरम स्पेशल गाडीला संगमेश्वर येथे थांबा देण्याबाबत सादर केलेल्या निवेदनावरही लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी संगमेश्वर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १ व २ वर डिजिटल कोच पोजिशन इंडिकेटर बसवण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. यामुळे गाड्यांमधील डब्यांची अचूक माहिती प्रवाशांना मिळणार आहे.
याशिवाय, स्थानकावर तिकीट तपासनीस (TC) यांची दररोज तपासणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित व शिस्तबद्ध होण्यास मदत होणार आहे.
या बैठकीदरम्यान श्री. गंगाराम टोपरे, श्री. मुकुंद सनगरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, या बैठकीत पद्मश्री गजानन माने यांनी कोकण रेल्वेचे चेअरमन श्री. संतोष झा यांच्याकडे दोन महत्त्वाचे विषय मांडले. कोकण रेल्वेचे शिल्पकार यांच्या नावाचा फलक स्थानकावर लावण्याची मागणी करण्यात आली, तसेच मांडवी एक्सप्रेस ही गाडी रात्री सुमारे ८.३० वाजता दिवा स्थानकावर न थांबता पुढे जाते, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने या गाडीला दिवा स्थानकावर थांबा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
यापैकी कोकण रेल्वेच्या शिल्पकारांच्या नावाचा फलक लावण्यास तात्काळ मान्यता देण्यात आली आहे.
सदर निर्णयांमुळे संगमेश्वर रेल्वे स्थानकाच्या सुविधा व सेवा मोठ्या प्रमाणात सुधारतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button