ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खेडमध्ये RPI चा कार्यकर्ता मेळावा

गावागावात संघटन मजबूत करण्याचा निर्धार; निवडणुकांच्या तयारीला वेग देण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन

खेड : आगामी ग्रामपंचायत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या खेड तालुका शाखेच्या वतीने २५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र, खेड येथे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास महायुतीतील पदाधिकाऱ्यांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे.
मेळाव्यात खेड तालुक्यातील पक्ष संघटनेचा आढावा घेत गावागावात संघटन मजबूत करणे, नवीन कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे आणि आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर संघटनात्मक बांधणी करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
RPI (आठवले) चे कोकण प्रदेश सरचिटणीस सी. आर. कांबळे आणि कोकण प्रदेश युवक अध्यक्ष सुशांत भाई सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात संघटनात्मक हालचालींना वेग देण्यात येत आहे. तालुकाध्यक्ष बाबाराम दगडू पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मेळाव्याचे सूत्रसंचालन सरचिटणीस जितेंद्र तांबे करणार आहेत. युवक अध्यक्ष विकास धुत्रे हे स्वागताध्यक्ष, तर पर्यावरण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र तांबे प्रास्ताविक करणार आहेत.
आगामी निवडणुका लक्षात घेता प्रत्येक गावात पक्षाची शाखा उभारणे, बूथनिहाय कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करणे आणि स्थानिक प्रश्नांवर सातत्याने भूमिका घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ‘गाव तिथे पक्षाची शाखा’ या संकल्पनेच्या माध्यमातून संघटन विस्तारण्यावर भर दिला जाणार आहे.
युवकांसह महिला आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांना संघटनेत सक्रिय जबाबदाऱ्या देऊन स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची सक्षम फळी उभी करण्याबाबतही मेळाव्यात चर्चा होणार आहे.
पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, रोजगार, शासकीय योजनांचा लाभ आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा करावा, असा संदेश संघटनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. निवडणुकीपुरते मर्यादित न राहता वर्षभर नागरिकांच्या प्रश्नांसाठी उपलब्ध राहणारी संघटनात्मक यंत्रणा उभारण्यावर भर देण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांसोबतच विविध तालुकास्तरीय समित्यांमध्ये महायुतीतील मित्रपक्ष म्हणून RPIच्या कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व मिळावे, तसेच पक्षाला १० टक्के वाटा मिळावा, अशी मागणीही मेळाव्यात मांडण्यात येणार आहे.

याशिवाय इच्छुक उमेदवारांची माहिती, गावनिहाय परिस्थिती, कार्यकर्त्यांची संख्या, स्थानिक प्रश्न आणि संभाव्य उमेदवारांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
आगामी ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यातून खेड तालुक्यात पक्ष संघटन विस्तारण्याचा निर्धार व्यक्त केला जाणार असून, या मेळाव्याकडे तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button