
आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त भारतीय तटरक्षक दल स्टेशन रत्नागिरीतर्फे भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर भव्य स्वच्छता मोहीम संपन्न

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवस आणि “स्वच्छ सागर, सुरक्षित तट” या राष्ट्रीय मोहिमेच्या ५ व्या पर्वाच्या निमित्ताने, भारतीय तटरक्षक दल स्टेशन रत्नागिरीच्या वतीने आज (१९ सप्टेंबर) सकाळी भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर भव्य स्वच्छता व सागरी संवर्धन मोहीम राबविण्यात आली. “स्वच्छ सागर, सुरक्षित तट – यही पहचान हमारी” या राष्ट्रीय संकल्पनेखाली आयोजित केलेल्या या मोहिमेचा मुख्य उद्देश सागरी प्रदूषण रोखणे, किनारपट्टी स्वच्छ व मूळ नैसर्गिक स्वरूपात राखणे आणि सागरी संवर्धनात नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवणे हा होता.

ही मोहीम सकाळी ७:३० वाजता स्टेशन समन्वय पथकाच्या नेतृत्वाखाली सुरू झाली. या उपक्रमात भारतीय तटरक्षक दल, पोलीस, नागरी प्रशासन, वैज्ञानिक संस्था, सुरक्षा दल, शाळा आणि स्थानिक युवा वर्गातील २५० हून अधिक सहभागींनी एकत्र येत उत्कृष्ट आंतर-विभागीय समन्वय घडवून आणला. यामध्ये सीमाशुल्क विभाग रत्नागिरी (कस्टम्स), सागरी पोलीस आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या प्रमुख प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी भारतीय तटरक्षक दलाचे स्टेशन कमांडर समादेशक शैलेश गुप्ता, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, तटरक्षक दलाच्या विविध यूनिट्सचे कमान अधिकारी उपस्थित होते. सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राच्या वैज्ञानिक प्रतिनिधींनी किनारपट्टी सर्व प्रकारच्या कचऱ्यापासून सुरक्षित व प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या पर्यावरणीय गरजेवर प्रकाश टाकला. तसेच, एनसीसी नेव्हल युनिट रत्नागिरीचे कॅडेट्स आणि इक्रा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उत्स्फूर्त सहभाग नोंदवून या मोहिमेला बळ दिले; तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनीही या उपक्रमात उत्साहाने भाग घेतला.
मोहिमेदरम्यान सहभागींनी समुद्रकिनाऱ्यावरील एकल-वापर प्लास्टिक, टाकून दिलेली मासेमारी जाळी आणि विघटन न होणारा इतर अजैविक कचरा गोळा करून त्याचे प्लास्टिक कचरा व सामान्य सागरी कचरा अशा स्वरूपात वर्गीकरण केले, जो पुढील योग्य विल्हेवाटीसाठी रत्नागिरी नगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी सर्व अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवकांनी सागरी संवर्धनाची राष्ट्रीय प्रतिज्ञा घेऊन महासागर संरक्षणासाठी आपली कटिबद्धता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी सर्व सहभागी संस्थांचे आभार मानले आणि कोकण किनारपट्टी सुरक्षित व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी स्थानिक रहिवासी तसेच पर्यटकांना जबाबदार सवयी अंगीकारण्याचे आवाहन केले.




