
रत्नागिरी रेल्वेस्थानकावर ‘एटीव्हीएम’ सुविधाप्रवाशांना दिलासा; तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याचा त्रास संपला
रत्नागिरी रेल्वेस्थानकावर प्रशासनाकडून ‘एटीव्हीएम’ ही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमुळे आता प्रवाशांना अवघ्या काही सेकंदांत तिकीट मिळणार असून, तासनतास रांगेत उभे राहण्याच्या त्रासापासून कायमची मुक्ती मिळणार आहे.
एटीव्हीएम या स्वयंचलित मशिनद्वारे प्रवासी अवघ्या काही सेकंदांत अनारक्षित आणि प्लॅटफॉर्म तिकीट सहज मिळवू शकणार आहेत. प्रवाशांना रोख रकमेऐवजी स्मार्टकार्ड तसेच युपीआय (क्यूआर कोड) द्वारे ऑनलाइन पेमेंट करून तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. सण-उत्सव आणि सुट्यांच्या काळात स्थानकावर होणारी प्रवाशांची तुफान गर्दी आणि तिकीट खिडकीवरील ताण कमी होण्यास यामुळे मोठी मदत होणार आहे. या मशिनची कार्यप्रणाली अत्यंत साधी-सोपी असून, प्रवाशांना स्वतःच स्क्रीनवर गंतव्य स्थानक निवडून तिकीट जनरेट करता येते. रत्नागिरी हे कोकण रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे स्थानक असल्याने येथे रोज हजारो प्रवाशांची ये-जा असते. अनेकदा ऐनवेळी स्थानकात पोहोचणाऱ्या प्रवाशांना तिकीट खिडकीवरील लांब रांगेमुळे ट्रेन सुटण्याची भीती असायची; मात्र, या आधुनिक सुविधेमुळे स्थानकातील तिकीटवाटप प्रक्रिया अधिक जलद, सुटसुटीत आणि पारदर्शक झाली आहे. रेल्वेस्थानकावर तिकीट खिडकीजवळील गर्दी टाळण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी प्रवाशांनी या ‘एटीव्हीएम’ सुविधेचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.




