
लहान मुलांना कर्करोग होण्याच्या प्रमाणात दुपटीने वाढ ! निम्म्या मुलांना रक्ताचा कर्करोग!! लॅन्सेटच्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर!!!
What should parents be careful about? : गेल्या दशकभरात लहान मुलांना कर्करोग होण्याचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. यातील निम्मी प्रकरणे रक्ताच्या कर्करोगाची आहेत. बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण आणि रासायनिक घटकांचा संपर्क ही यामागील प्रमुख कारणे मानली जातात.’लॅन्सेट’ने दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेतील (सार्क) देशांमध्ये केलेल्या संशोधनातून ही बाब स्पष्ट झाली. या देशांत ० ते १४ वयोगटातील ६० कोटी मुले राहतात. त्यातील २५ ते ३० कोटी बालके भारतातील आहेत.
संशोधनात सहभागी वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, १५ वर्षांपूर्वीच्या तुलनेत सध्या रुग्णालयांमध्ये कर्करोग उपचारांसाठी येणाऱ्या लहान मुलांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यातही १० वर्षांहून कमी वयाच्या बालकांमध्ये रक्ताचा कर्करोग अधिक प्रमाणात आढळतो आहे. वाढती लोकसंख्या, आजाराविषयी जागरूकता आणि चाचण्यांची उपलब्धता यामुळे कर्करोगाचे निदान लवकर होत असले, तरी प्रत्यक्ष आजार जडण्याचे प्रमाणही वाढले आहे.
वाढीची मुख्य कारणे
वाढते प्रदूषण, हवेत मिसळणारी घातक रसायने, जंक फूडचे अतिसेवन, तसेच शेतमालावरील कीटकनाशकांची बेसुमार फवारणी या सर्व घटकांचा लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. ज्या भागात कीटकनाशकांचा वापर जास्त आहे, तिथे कर्करोगाचा धोका अधिक असल्याचे दिसून येत आहे.
सकारात्मक बाजू आणि उपचार
मुलांमधील कर्करोग अत्यंत आक्रमक स्वरूपाचा असला, तरी प्रौढांच्या तुलनेत बालकांमध्ये हा आजार पूर्णपणे बरा होण्याचा दर खूप चांगला आहे. योग्य वेळी आणि संपूर्ण उपचार मिळाल्यास मुलांमध्ये ल्यूकेमिया पूर्ण बरा होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत आहे. कर्करोग तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात असला तरीही मुले बरी होऊ शकतात. असे हे संशोधन नमूद करते. केमोथेरपी आणि रेडिएशन व्यतिरिक्त प्रोटॉन थेरपी सारख्या अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत. या थेरपीमुळे निरोगी पेशींना होणारी हानी टळते.
सकारात्मक बाजू आणि उपचार
मुलांमधील कर्करोग अत्यंत आक्रमक स्वरूपाचा असला, तरी प्रौढांच्या तुलनेत बालकांमध्ये हा आजार पूर्णपणे बरा होण्याचा दर खूप चांगला आहे. योग्य वेळी आणि संपूर्ण उपचार मिळाल्यास मुलांमध्ये ल्यूकेमिया पूर्ण बरा होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत आहे. कर्करोग तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात असला, तरीही योग्य उपचारांनी मुले बरी होऊ शकतात, असे हे संशोधन नमूद करते. केमोथेरपी आणि रेडिएशनव्यतिरिक्त प्रोटॉन थेरपीसारख्या अत्याधुनिक उपचारपद्धती उपलब्ध होत आहेत. या थेरपींमुळे निरोगी पेशींना होणारी हानी टळते.
पालकांनी काय काळजी घ्यावी?
मुलांना सातत्याने येणारा ताप, वजन घटणे, शरीरावर अचानक आलेली सूज किंवा गाठी आणि थकवा यांसारखी लक्षणे दिसल्यास पालकांनी विलंब न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सुरुवातीच्या टप्प्यातच निदान झाल्यास योग्य उपचारांच्या मदतीने बालकांना कर्करोगमुक्त करणे शक्य आहे.
तज्ञांचे म्हणणे काय?
राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर कर्करोग विभागप्रमुख डॉक्टर नरेंद्र अग्रवाल यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की,
इंडियन कॅन्सर सोसायटीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार जगात दर वर्षी तीन लाख मुलांना कर्करोगाचे निदान होते. त्यांपैकी ५० हजार मुले भारतातील आहेत. रोगाचे उशिरा होणारे निदान, विशेष कर्करोग केंद्रांची असमान उपलब्धता, खर्च किंवा वाहतुकीच्या अडचणींमुळे उपचारांमधून कुटुंबांनी मध्येच घेतलेली माघार आणि कर्करोग नोंदणीतील सातत्यपूर्ण त्रुटी ही आव्हाने आहेत.
कर्करोग तज्ञ डॉक्टर तुषार पाटील म्हणतात
लहान मुलांना कर्करोग होण्यामागचे नेमके कारण स्पष्ट नसले, तरी प्रदूषण, रसायने आणि अन्नपदार्थांतील कीटकनाशकांचा प्रभाव ही संभाव्य कारणे असू शकतात. गेल्या १०-१५ वर्षांत जनजागृती वाढल्यामुळे रुग्ण उपचारांसाठी लवकर येत असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे.




