
चिपळूण रेल्वे स्थानकावर पाण्याची नासाडी; आठ ठिकाणी पाइपलाइनला गळती
सावंतवाडी-दिवा गाडीला पाणी भरताना प्रकार; सचिन प्रमोद शेठ यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार
चिपळूण रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्यांना पाणी भरण्यासाठी असलेल्या पाइपलाइनमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. सावंतवाडी-दिवा गाडीला पाणी भरत असताना किमान आठ ठिकाणी पाइपलाइनमधून पाणी गळत असल्याचे मंडणगड येथील प्रवासी सचिन प्रमोद शेठ यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली.
चिपळूण रेल्वे स्थानकावर सावंतवाडी-दिवा गाडीला पाणी भरले जात असताना पाइपलाइनमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याचे शेठ यांनी पाहिले. त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता, या गळतीबाबत तक्रार करण्यात आल्याचे संबंधित कर्मचाऱ्यांनी सांगितले.
यानंतर शेठ यांनी स्थानक मास्तरांची भेट घेऊन पाण्याची नासाडी होत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी ही गळती व्हॉल्व्हमधील समस्येमुळे होत असल्याचे स्थानक मास्तरांनी सांगितले. मात्र, समस्या माहिती असूनही त्याची दुरुस्ती करण्यात विलंब का होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, स्थानक परिसरातील एका नळातूनही सातत्याने पाणी वाया जात असल्याचे शेठ यांनी स्थानक मास्तरांना सांगितले. या नळातून पाणी वाया जात असल्याची माहिती स्थानक मास्तरांना नसल्याचेही त्यांनी सांगितले.
पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असून, रेल्वे स्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणारी पाण्याची नासाडी तातडीने थांबविणे आवश्यक आहे. संबंधित यंत्रणेने पाइपलाइन, व्हॉल्व्ह तसेच नळांची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी सचिन प्रमोद शेठ यांनी केली आहे.




