
गुहागरात ‘एक दिवा शहिदांसाठी’; शहरवासीयांकडून जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त
शिवतेज फाऊंडेशनचा उपक्रम; पर्यटकांनीही सहभाग नोंदवत शहिदांना केले अभिवादन
गुहागर : दहशतवादी हल्ल्यांत शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासह सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या आणि कुटुंबापासून दूर राहून कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवतेज फाऊंडेशन, गुहागरच्या वतीने ‘एक दिवा शहिदांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला. दिवाळीच्या पहिल्या दिवशी धनत्रयोदशीला सायंकाळी शहरातील गांधी चौक, बाजारपेठ येथे हा कार्यक्रम झाला.
केवळ दूरचित्रवाणी किंवा वर्तमानपत्रांतील बातम्या पाहून हळहळ व्यक्त न करता जवानांप्रती कृतज्ञता प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. कोणतेही राजकीय अथवा सामाजिक अभिनिवेश न ठेवता गुहागरवासीय या उपक्रमात एकत्र येतात. यंदाही शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. विशेष म्हणजे पर्यटनासाठी गुहागरमध्ये आलेल्या पर्यटकांनीही या उपक्रमात सहभागी होत जवानांप्रती आदर व्यक्त केला.
यावेळी निवृत्त माजी सैनिक प्रताप शिर्के यांच्यासह गुहागर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा नीता मालप, उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल, माजी नगराध्यक्षा स्नेहा वरंडे, पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे, लायन्स क्लबचे अध्यक्ष मनीष खरे, शैलेंद्र खातू, निखिल तांबट, सचिन मुसळे, डॉ. अनिकेत गोळे, गुहागर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज बावधनकर, ब्रह्माकुमारी विश्व विद्यालयाच्या सीमा बेहनजी, शिवतेज फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. संकेत साळवी, निलेश गोयथळे, संतोष वरंडे, गणेश धनावडे, विकास मालप, सुधाकर कांबळे, प्रभुनाथ देवळेकर, श्रद्धा घाडे, ॲड. सुप्रिया वाघधरे, सारिका कनगुटकर, शीतल साळवी यांच्यासह शहरवासीय उपस्थित होते.




