
वाशिष्ठीसह रत्नागिरीतील नद्यांच्या गाळ उपशाबाबत महत्त्वपूर्ण बैठक!
रत्नागिरी जिल्ह्यातील वाशिष्ठी नदीसह इतर नद्यांमधील गाळ काढण्याच्या कामासंदर्भात आज चिपळूण येथे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
नद्यांमध्ये साचलेल्या गाळामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी, पावसाळ्यातील संभाव्य पूरस्थिती तसेच गाळ उपशाच्या कामासंदर्भातील विविध विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. नद्यांची पाणीवहन क्षमता वाढवणे, पूरस्थितीचा धोका कमी करणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गाळ उपशाची कामे प्रभावीपणे राबवणे आवश्यक आहे. याअनुषंगाने संबंधित विभाग, नाम फाऊंडेशन आणि स्थानिक प्रतिनिधी यांच्याशी विविध उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली असल्याचे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.
या बैठकीला जिल्हाधिकारी श्री. मनुज जिंदल, चिपळूणचे प्रांताधिकारी श्री. आकाश लिगाडे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, जलसंपदा यांत्रिकी विभाग, अलोरे येथील कार्यकारी अभियंता, नाम फाऊंडेशनचे पदाधिकारी, चिपळूण बचाव समितीचे प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.




