भारत पर्वच्या राष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी कोकणची कन्या पूर्वा प्रविण किणे!

'भटकंती बाय पूर्वा'ला १० कोटींहून अधिक व्ह्यूज; PIB मुंबईमार्फत राष्ट्रीय स्तरावर निवड, कोकणच्या पर्यटनवैभवाची देशभर ओळख

रत्नागिरी : कोकणच्या निसर्गसौंदर्याची, गडकिल्ल्यांच्या ऐतिहासिक वैभवाची आणि समृद्ध संस्कृतीची ओळख डिजिटल माध्यमातून देशभर पोहोचविणाऱ्या रत्नागिरीच्या पूर्वा प्रविण किणे यांनी मोठे यश संपादन केले आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे आयोजित ‘भारत पर्व २०२६’ या राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. त्यांच्या ‘भटकंती बाय पूर्वा’ या इंस्टाग्राम पेजला आतापर्यंत १० कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, त्यांच्या या निवडीमुळे रत्नागिरीसह संपूर्ण कोकणाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

गुजरातमधील एकतानगर येथे ३० ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत भारत पर्व २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेवर आधारित या महोत्सवात देशातील विविध राज्यांची संस्कृती, लोककला, परंपरा, हस्तकला आणि पर्यटनवैभव सादर करण्यात आले. देशभरातील निवडक डिजिटल कंटेंट क्रिएटर्समधून प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB), मुंबई यांच्यामार्फत पूर्वा यांची निवड करण्यात आली होती. या राष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख मांडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली.

पूर्वा किणे यांचा प्रवासही विशेष प्रेरणादायी आहे. रत्नागिरीतील जी.जी.पी.एस. आणि देवरुख येथील अरुंधती पाध्ये यांच्याकडे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबईतील रुपारेल आणि भवनस महाविद्यालयात पुढील शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत VFX एडिटर म्हणून अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, इतिहास, निसर्ग आणि भटकंतीची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे गड-किल्ले सर करण्यास त्यांनी सुरुवात केली आणि हळूहळू भटकंती हाच त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनला.

चित्रपटसृष्टीतील कारकीर्द सोडून पूर्णवेळ पर्यटन आणि डिजिटल कंटेंट निर्मितीकडे वळलेल्या पूर्वा यांनी ‘भटकंती बाय पूर्वा’ या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक, निसर्गरम्य आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. विशेषतः कोकणातील गडकिल्ले, समुद्रकिनारे, खाद्यसंस्कृती, स्थानिक परंपरा आणि ग्रामीण जीवनशैली यांना त्यांनी आपल्या व्हिडिओंच्या माध्यमातून नवी ओळख मिळवून दिली.

त्यांच्या या डिजिटल प्रवासाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, इंस्टाग्रामवर १० कोटींहून अधिक व्ह्यूजचा टप्पा गाठणे ही त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीची पावती मानली जात आहे. आता भारत पर्वच्या राष्ट्रीय व्यासपीठावरून कोकणचे पर्यटनवैभव देशासमोर मांडण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या कार्याला आणखी व्यापक ओळख मिळाली आहे.

स्थानिक पातळीवर सुरू झालेला प्रवास राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविणाऱ्या पूर्वा प्रविण किणे यांनी तरुण डिजिटल क्रिएटर्ससमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. चित्रपटसृष्टीतील अनुभव, इतिहासाची आवड, गड-किल्ल्यांची भटकंती आणि डिजिटल माध्यमांवरील प्रभावी काम यांच्या जोरावर त्यांनी कोकणचा नावलौकिक वाढविला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button