मुंबई–गोवा महामार्गावरील हातिवले येथील टोलनाका पुन्हा सुरू करण्याच्या हालचालींना वेग


राजापूर : मुंबई–गोवा महामार्गावरील हातिवले येथील टोलनाका पुन्हा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असून, येत्या २३ मेपासून टोल वसुली सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टोल संचालनासाठी सुरू असलेल्या निविदा प्रक्रियेत अनेक कंपन्यांनी रस दाखवला असून संबंधित कंपन्यांकडून प्राथमिक सर्वेक्षण व पाहणी केली जात असल्याची माहिती पुढे आली आहे.

दरम्यान, टोलनाका पुन्हा सुरू करण्याच्या हालचालींमुळे स्थानिक रहिवासी, वाहनचालक तसेच व्यापारी वर्गात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई–गोवा महामार्गाचे अनेक भाग अद्याप अपूर्ण असून, सेवा रस्त्यांची कामे रखडलेली आहेत. काही ठिकाणी सुरक्षेच्या समस्या देखील कायम असल्याने अशा परिस्थितीत टोल आकारणीला विरोध वाढत आहे. यापूर्वीही स्थानिकांनी टोलमाफीची मागणी केली होती.

याच पार्श्वभूमीवर राजापूर पंचायत समितीच्या मासिक सभेत हातिवले टोलनाका सुरू करण्यास तीव्र विरोध दर्शविण्यात आला. तसेच स्थानिक वाहनचालकांना टोलमधून सूट देण्यात यावी, असा ठराव सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.

टोलनाका सुरू करण्याबाबत अद्याप अधिकृत आदेश जाहीर झालेला नसून, पुढील काही दिवसांत यासंदर्भात स्पष्टता येण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्थानिक पातळीवर या निर्णयाविरोधात आंदोलन छेडण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button