राहुल गांधींच्या पुतळा दहन प्रकरणी वैभव खेडेकरांसह भाजप कार्यकर्त्यांवर कारवाईची काँग्रेसची मागणी

खेड : खेड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून आक्षेपार्ह घोषणाबाजी करण्यात आल्याचा आरोप करत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने खेड पोलिसांकडे केली आहे.
जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले. निवेदनात २३ जुलै रोजी भारतीय जनता पक्षाचे नेते वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करत प्रतिकात्मक पुतळ्याचे सार्वजनिक दहन केले तसेच आक्षेपार्ह व चिथावणीखोर घोषणाबाजी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचण्याची शक्यता निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच लोकशाही व्यवस्थेत मतभेद व्यक्त करण्यासाठी वैधानिक मार्ग उपलब्ध असताना सार्वजनिक ठिकाणी पुतळा दहन व आक्षेपार्ह घोषणाबाजी करणे हा गंभीर प्रकार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
काँग्रेसने आपल्या निवेदनाद्वारे वैभव खेडेकर व संबंधित कार्यकर्त्यांविरुद्ध चौकशी करून लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करावा, उपलब्ध सीसीटीव्ही, व्हिडिओ, छायाचित्रे व सोशल मीडियावरील पुराव्यांची तपासणी करून संबंधितांची ओळख पटवावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष सोनलक्ष्मी घाग, जिल्हा सरचिटणीस फैसल देसाई, गौस खतीब, नगरसेवक साजिद सरगुरो, साफ गोटे, निर्मला जाधव, तालुकाध्यक्ष अजीम सुर्वे, तालुका सरचिटणीस प्रफुल्ल शेवरकर, माजी नगरसेवक बशीर मुजावर, सीमा शिंदे, मंगेश भैरवकर, राबिया जसनाईक, नाझीमा तांबे, मुमताज तांबे, सुवर्णा गमरे आदी उपस्थित होते. काँग्रेसच्या या निवेदनावर अद्याप पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया किंवा कारवाईबाबतची माहिती उपलब्ध झालेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button