
जांभेकर विद्यालयात ‘आनंददायी बाजार’ उपक्रमातून उद्योजकतेचे धडे
रत्नागिरी : सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात आज ‘आनंददायी शनिवार’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची आवड निर्माण करणाऱ्या ‘आनंददायी बाजार’ या अभिनव उपक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्या म्हणून रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, उद्योजक विनयकुमार पटवर्धन, शाळा समिती अध्यक्ष राजन मलुष्टे आणि मालतीबाई जोशी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास पांचाळ, शाळेच्या मुख्याध्यापिका संजना तारी उपस्थित होते.
शाळेच्या प्रांगणातील आनंददायी बाजारातील विक्री स्टॉल आजपासून सोमवार, दिनांक २ नोव्हेंबरपर्यंत सर्व नागरिकांसाठी खुले ठेवण्यात आले आहेत. उद्घाटनप्रसंगी कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन यांनी या अभिनव उपक्रमाचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. अशा उपक्रमांमधून वस्तुनिर्मितीचे कौशल्य, वस्तूंची देवाणघेवाण, खरेदी-विक्री, व्यवहारज्ञान आणि व्यापाराची मूलभूत तत्त्वे विद्यार्थ्यांना शिकता येतात. आजचे विद्यार्थी उद्याच्या व्यापारविश्वातील यशस्वी उद्योजक बनतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्योजक विनयकुमार पटवर्धन यांनीही या उपक्रमाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. प्रत्यक्ष व्यवहारातून शिक्षण देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
शाळा समिती अध्यक्ष राजन मलुष्टे यांनी स्वकर्तृत्व, स्वच्छता, ‘कमवा व शिका’, आत्मनिर्भरता आणि उद्योजकता यांसारखी जीवनमूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. प्रशालेमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सामाजिक, व्यावहारिक आणि जीवनोपयोगी मूल्यांचे शिक्षण देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
आनंददायी बाजाराचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून, हस्तकौशल्यातून आणि मेहनतीतून तयार केलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल. यात आकर्षक आकाशकंदील, पणत्या, मेणबत्त्या, अगरबत्त्या, रांगोळी, वाती, रांगोळी डिझाईन्स, शोभेची झाडे, फुलझाडे, गांडूळ खत, गोमूत्रापासून तयार केलेले साबण, आयुर्वेदिक उटणे, शाम्पू, फिनेल, करवंटीपासून बनविलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, पारंपरिक वस्तू तसेच विविध खाद्यपदार्थांची विक्रीसाठी मांडणी करण्यात आली होती.
या वस्तूंच्या आकर्षक मांडणीमुळे बाजारपेठेला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले होते. विद्यार्थ्यांनी स्वतः ग्राहकांशी संवाद साधत वस्तूंची माहिती देणे, त्यांचे दर सांगणे, खरेदी-विक्रीचे व्यवहार करणे आणि पैशांचे व्यवस्थापन करणे अशा विविध जबाबदाऱ्या उत्साहाने पार पाडल्या. या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बाजारपेठेचा अनुभव मिळाला. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, संवादकौशल्य, निर्णयक्षमता, आर्थिक साक्षरता आणि सहकार्याची भावना विकसित होण्यास मदत झाली.




