
चिपळूण नगरपालिकेच्या उपमुख्याधिकारीपदी अनंत मोरे; सोमवारपासून स्वीकारणार पदभार
फुरसुंगी नगर परिषदेतून पुन्हा चिपळूणमध्ये आगमन; पालिकेत आता दोन उपमुख्याधिकारी
चिपळूण, ता. ३१ : चिपळूण नगरपालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेत आणखी एका अनुभवी अधिकाऱ्याची भर पडणार आहे. नगरपालिकेच्या उपमुख्याधिकारीपदी अनंत मोरे यांची नियुक्ती झाली असून, येत्या सोमवारपासून ते पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे पालिकेत आता दोन उपमुख्याधिकारी कार्यरत असणार आहेत.
चिपळूण तालुक्यातील कापरे गावचे सुपुत्र असलेले अनंत मोरे यांचे पुन्हा चिपळूण नगरपालिकेत आगमन होत आहे. यापूर्वी त्यांनी चिपळूण नगरपालिकेत कार्यालयीन अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. या काळात शहरातील विकासकामे, नागरी समस्या आणि नागरिकांच्या प्रशासकीय अडचणी सोडविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
गेल्या काही वर्षांपासून ते पुणे येथील फुरसुंगी नगर परिषदेत उपमुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. प्रशासकीय कामकाजाचा अनुभव आणि नागरिकांशी असलेला थेट संपर्क ही त्यांची जमेची बाजू मानली जाते.
सध्या चिपळूण नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून संजय जाधव, तर उपमुख्याधिकारी म्हणून प्रमोद ठसाळे कार्यरत आहेत. आता अनंत मोरे यांचीही या पदावर नियुक्ती झाल्याने प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी विभागून घेणे शक्य होणार आहे. शहरातील प्रलंबित नागरी प्रश्न, विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाला त्यांच्या अनुभवाची जोड मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




