निवसर बागवाडी पुनर्वसनग्रस्तांच्या वर्षानुवर्षांच्या समस्यांना अखेर न्याय; आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला यश

लांजा: अतिवृष्टीमुळे सन २००५ साली भूस्खलनाचा फटका बसलेल्या लांजा तालुक्यातील निवसर बागवाडी येथील पुनर्वसनग्रस्त ग्रामस्थांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या अखेर मार्गी लागल्या आहेत. आमदार किरण सामंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याची जोड मिळाल्याने पुनर्वसनग्रस्तांना विविध मूलभूत सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सन २००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील निवसर बागवाडी येथे भूस्खलन होऊन नागरिकांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले होते. मात्र, पुनर्वसनानंतरही अनेक वर्षे येथील नागरिकांना रस्ते, पाणी, पथदीप, मालमत्तेच्या नोंदी, सातबारा उतारा आणि अन्य नागरी सुविधांसाठी संघर्ष करावा लागत होता. या संदर्भात ग्रामस्थांनी वेळोवेळी पत्र व्यवहार केला.

या भूस्खलनामध्ये बाधित झालेल्या २८ कुटुंबातील सुमारे १४० एवढी लोकसंख्या होती. या वसाहतीत असलेल्या घरांना अंतर्गत रस्त्याची असुविधा तसेच वृद्ध व्यक्तीचे आजारपण, त्यांना औषध उपचारासाठी मुख्य रस्त्यापर्यंत नेणे, मयत व्यक्तींची प्रेते अंत्यविधीसाठी कब्रस्ताना पर्यंत नेणे या बाबी अडचणीच्या ठरतात होत्या, त्यामुळे वसाहतींची एकूण भौगोलिक स्थिती पाहता अंतर्गत रस्त्यांची आवश्यकता होती.

तर पुनर्वसनग्रस्तांच्या समस्यांची दखल घेत राजापूर-लांजा विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तर पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने रस्ता, स्ट्रीट लाईट, पाणीपुरवठा, सातबारा उतारा, कब्रस्तान, निवारा शेड, संरक्षण भिंत आणि वाडीअंतर्गत रस्ता अशा विविध कामांबाबत सकारात्मक कार्यवाही झाली आहे. त्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्यांना आता मूर्त स्वरूप मिळू लागले आहे.

दरम्यान, पुनर्वसनग्रस्त नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल निवसर गाव विकास कमिटीतर्फे आमदार किरण सामंत आणि उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना मार्ग मिळाल्याने पुनर्वसनग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

त्याचप्रमाणे २००५ पासून या पुर्नवसन संदर्भातील पाठपुरावा हा निवसर गाव कमिटीचे अध्यक्ष तथा गवाणे पं.स.गणाचे विभागप्रमुख अल्ताफ काजी, उप शाखाप्रमुख अख्तर सागवेकर तसेच गाव कमिटीचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी वेळोवेळी संबंधित विविध प्रशासकीय विभागात पाठपुरावा केल्याने त्यांचे आणि प्रशासनाचे बाधितांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button