
आयटीआय संगमेश्वर येथे आयएमसीच्या कामकाजाकरिता लेखनिक सहाय्यक पदभरती
रत्नागिरी, दि. 8 ):- औद्योगिक प्रशिक्षण संस्था संगमेश्वर येथे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत संस्था व्यवस्थापन समिती (आयएमसी) च्या कामकाजाकरिता तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर लेखनिक सहाय्यकची नेमणूक करावयाची आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता व अनुभवानुसार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था संगमेश्वर येथे सार्वजनिक सुट्टी वगळून कार्यालयीन कामकाज वेळेत दि. 16 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज हस्तदेय सादर करावे. पोस्टाने अथवा ईमेल द्वारे केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
लेखनिक सहाय्यक या पदासाठी उमेदवाराकडे वाणिज्य शाखेतील पदवी, संगणक ज्ञान, मराठी आणि इंग्रजी टंकलेखन व इंटरनेट हाताळण्याचे ज्ञान आवश्यक आहे. उमेदवारास किमान एक वर्षाचा शैक्षणिक अर्हतेनुसार अनुभव असणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारास समान संधी याप्रमाणे निवड करण्यात येईल. सदर पदाकरीता वेतन दरमहा 12 हजार रुपये व पुढे 5 टक्के वार्षिक दरवाढ असेल.
पदाची नियुक्ती अकरा महिने कालावधीसाठी व कामकाज समाधानकारक असल्यास पुढील दोन वर्षा करिता प्रत्येकी अकरा महिन्याची नियुक्ती याप्रमाणे असेल. उमेदवारास दरवर्षी अकरा महिन्याचे बंदपत्र देणे अनिवार्य आहे. याबाबतीत कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याविषयी कोणतीही तरतूद नाही. हे पद केंद्रशासित पुरस्कृत योजनअंतर्गत असल्याने योजना चालू असे पर्यंतच सेवेत कार्यरत ठेवण्यात येईल. उमेदवारास अनुभव प्रमाणपत्र अथवा सेवेत कार्यरत असलेला कोणताही दाखला अथवा प्रमाणपत्र देण्यात येणार नाही. कार्यालयीन कामकाजाकरिता प्रवास करावा लागेल.




