घरडा इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापकांची संशोधन व कौशल्यविकासात उल्लेखनीय कामगिरी

खेड : घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (GITM)च्या रासायनिक अभियांत्रिकी विभागातील दोन प्राध्यापकांनी संशोधन आणि व्यावसायिक विकास क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुहास डी. डोके यांना “Soxhlet Extraction with Mechanical Stirring” या नावाच्या डिझाईन पेटंटला मान्यता मिळाली आहे. रासायनिक अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या नाविन्यपूर्ण संशोधनाची ही दखल असून संस्थेच्या बौद्धिक संपदा निर्मितीत या पेटंटची महत्त्वपूर्ण भर पडली आहे.
तसेच प्रा. जयेश व्ही. मापारा यांनी राष्ट्रीय तांत्रिक शिक्षक प्रशिक्षण व संशोधन संस्था (NITTTR) आयोजित राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) आधारित परिणामाधिष्ठित शिक्षण (Outcome-Based Education-OBE), अभ्यासक्रम रचना, अध्यापन-अध्ययन पद्धती, मूल्यमापन प्रणाली आणि तांत्रिक शिक्षणातील गुणवत्तावृद्धी या विषयांवर हा कार्यक्रम आधारित होता.
या यशाबद्दल विभागप्रमुख डॉ. एस. के. कुलकर्णी यांनी दोन्ही प्राध्यापकांचे अभिनंदन करताना सांगितले की, अशा यशामुळे विभागातील संशोधन संस्कृती अधिक समृद्ध होत असून विद्यार्थ्यांना संशोधन, नवोपक्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रेरणा मिळत आहे.
संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील यांनीही दोन्ही प्राध्यापकांचे अभिनंदन करून घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचे व्यवस्थापन संशोधन, पेटंट, नवोपक्रम, उद्योगाभिमुख उपक्रम, व्यावसायिक प्रशिक्षण आणि कौशल्यविकासासाठी प्राध्यापकांना सातत्याने प्रोत्साहन व आवश्यक सहकार्य देत असल्याचे सांगितले.
प्राध्यापकांच्या ज्ञानवृद्धीसह त्यांचे तांत्रिक व व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी संस्था आवश्यक सुविधा आणि सकारात्मक वातावरण उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. सुहास डी. डोके आणि प्रा. जयेश व्ही. मापारा यांच्या या यशामुळे घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटच्या संशोधनाभिमुख दृष्टीकोनाला आणि नवोपक्रमाला चालना मिळाली असून संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेतही मोलाची भर पडल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे व्यवस्थापन, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि संपूर्ण घरडा परिवाराने दोन्ही प्राध्यापकांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button