
विशेष सखोल पुनरिक्षण-२०२६: प्रारूप मतदार यादी जाहीर ३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती दाखल करण्याचे आवाहन
रत्नागिरी, दि. १० ):- विशेष सखोल पुनरिक्षण-२०२६ अंतर्गत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.
दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी:
याद्या जाहीर झाल्यानंतर ३१ ऑगस्ट २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांना दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. या कालावधीत नवमतदारांना तसेच मतदार यादीतील पत्त्यावर हजर नसलेल्या किंवा अन्यत्र स्थलांतरित झाल्यामुळे नाव समाविष्ट होऊ शकले नाही अशा नागरिकांना आपल्या सध्याच्या रहिवासाच्या ठिकाणावरून प्रपत्र-६ व त्यासोबत घोषणापत्र भरून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
इतर अर्ज व सुविधा:
नाव वगळण्यासाठी: यादीतील नाव वगळण्यासाठी नमुना-७ (संबंधित मतदारसंघाचा मतदार असलेल्या व्यक्तीस) भरता येईल.
नोंदणीमध्ये दुरुस्ती: यादीतील नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना-८ भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
नमुना क्रमांक ९-नावे समाविष्ट करण्यासाठी नमुना-6 मध्ये प्राप्त अर्जाची यादी, नमुना 10-नावांच्या समावेशनाला आक्षेप घेण्यासाठी नमुना-7 मध्ये प्राप्त अर्जाची यादी, नमुना 11-नोंदीमधील दुरुस्ती/मतदार ओळखपत्र बदलणे/दिव्यांग चिन्हांकन यासाठी नमुना-8 मध्ये प्राप्त अर्जाची यादी, नमुना 11-अ मतदार संघामध्ये अन्यत्र स्थलांतरित झाल्यामुळे पत्ता बदलण्यासाठी नमुना 8 मध्ये प्राप्त अर्जाची यादी. नमुना 11-ब मतदार संघाबाहेरुन स्थलांतरित झाल्यामुळे पत्ता बदलण्यासाठी नमुना 8 मध्ये प्राप्त अर्जाची यादी.
लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ नुसार मतदार यादीच्या पुनरिक्षणार्च्या अनुषंगाने किंवा मतदार यादीतील नोंदीसंदर्भात चुकीचे विधान किंवा घोषणा करणाऱ्या व्यक्तीस एक वर्षापर्यंतचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दावे व हरकती दाखल केल्यानंतर त्याबाबतच्या याद्या संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून सूचना फलकावर प्रदर्शित केल्या जातात व सात दिवसांच्या कालमर्यादेनंतर त्या अनुषंगाने निर्णय घेतला जातो. चालू असलेल्या एसआयआर (SIR) मधील दावे/हरकती दाखल केल्यापासूनच्या सात दिवसांच्या कालावधीतील तपशील (नमुना-६, ७ व ८ ची यादी) मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/ या संकेतस्थळावर “Claims and Objections during SIR-2026” या शीर्षखाली उपलब्ध करून देण्यात आला आहे.




