
कॉकपिटमध्ये हल्ला, गंभीर जखमी असतानाही दाखवले शौर्य; भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांचा यूएईकडून सन्मान!
Captain Smit Machch¿har UAE Honor Bravery Award : फ्लायदुबईच्या विमानातील कॉकपिटमध्ये ३० सप्टेंबर रोजी घडलेल्या हल्ल्याच्या प्रसंगी धैर्य दाखवणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा संयुक्त अरब अमिरातीने सन्मान केला आहे.
गंभीर जखमी असूनही कॅप्टन मच्छार यांनी कॉकपिटचे दार उघडले, त्यामुळे विमानातील कर्मचारी आणि प्रवाशांना हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत झाली. त्यांच्या या धाडसामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळण्यासही मदत झाली. याबद्दल इंडिया टुडेने सविस्तर वृत्त दिले आहे.
यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी या घटनेत सहभागी असलेल्या फ्लायदुबईच्या कर्मचाऱ्यांना ‘फर्स्ट क्लास ऑर्डर ऑफ झायेद II’ हा सन्मान प्रदान केला. आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांचे संरक्षण करण्यासाठी आणि विमान सुरक्षित ठेवण्यासाठी दाखवलेल्या धैर्याची दखल या पुरस्काराद्वारे घेण्यात आली.
दुबईचे युवराज शेख हमदान यांच्या हस्ते सन्मान
दुबईचे युवराज, यूएईचे उपपंतप्रधान आणि संरक्षणमंत्री शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. मंगळवारी यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद यांनी दुबईचे शासक आणि यूएईचे उपाध्यक्ष व पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या उपस्थितीत या कर्मचाऱ्यांची भेट घेतली.
विमानातील प्रवाशांचे संरक्षण आणि विमानाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या धैर्याचे आणि व्यावसायिक कौशल्याचे यूएईच्या प्रमुख नेतृत्व आणि शासन व्यवस्थेने कौतुक केले. नागरिकांची सुरक्षा आणि संरक्षण हे देशाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही प्रमुख नेतृत्व आणि शासन व्यवस्थेने अधोरेखित केले. हा सन्मान स्वीकारताना कर्मचाऱ्यांनी यूएईच्या अध्यक्षांचे आभार मानले आणि हा पुरस्कार मिळाल्याचा अभिमान व्यक्त केला.
जखमी वैमानिकाची भेट घेत शेख हमदान यांनी केले होते कौतुक
३ ऑक्टोबर रोजी उपचार सुरू असताना शेख हमदान यांनी कॅप्टन स्मित मच्छार यांची रुग्णालयात भेट घेतली होती. गंभीर जखमी अवस्थेतही त्यांनी दाखवलेल्या धैर्याचे आणि जबाबदारीच्या भावनेचे शेख हमदान यांनी कौतुक केले होते. ‘वैमानिकाने धैर्य, जबाबदारी आणि मानवी जीवनाबद्दलची काळजी यांचे सर्वोच्च उदाहरण दाखवले,’ अशा आशयाचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
संयुक्त अरब अमिरातीच्या प्रमुख नेतृत्वाने कॅप्टन मच्छार हे युएईच्या राष्ट्रीय प्रवासाचा एक अभिमानाचा भाग असल्याचे गौरवाने सांगितले. युएई हा दयार्द्रतेचा, शांततेचा आणि जीवनाचा सन्मान करणारा देश असल्याचे नमूद करत नेतृत्वाने त्यांच्या योगदानाची उच्च प्रशंसा केली. यापूर्वी, युएईच्या जनरल सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीनेही आपत्कालीन परिस्थितीत धैर्याने विमान नियंत्रणात आणणारे कॅप्टन मच्छार, विमान कर्मचारी आणि मदत करणाऱ्या प्रवाशांचे जाहीर कौतुक केले होते.
भारत, इस्रायल आणि अमेरिकेकडूनही शौर्याचे कौतुक
कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाची आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेण्यात आली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा उल्लेख नायक म्हणून केला, तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी त्यांच्या शौर्याचे कौतुक केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही गंभीर जखमी असतानाही कॉकपिटचे दार उघडल्याबद्दल मच्छार यांची प्रशंसा केली.
इस्रायलनेही कॅप्टन मच्छार यांच्यासाठी नागरी शौर्य पुरस्कार जाहीर केला आहे. दुखापतीतून ते पूर्णपणे बरे झाल्यानंतर हा पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.




