
चिपळूण नगर परिषदेच्या ऐतिहासिक वास्तूला भावपूर्ण निरोप
दशकांच्या आठवणींना उजाळा; निवृत्त व विद्यमान अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भावना अनावर
चिपळूण : शहराच्या वैभवात भर घालणारी आणि अनेक दशकांचा इतिहास जपणारी चिपळूण नगर परिषदेची ऐतिहासिक वास्तू आता निरोपाच्या उंबरठ्यावर आहे. या वास्तूत सेवा बजावलेल्या माजी व विद्यमान अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत या वास्तूप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे.
या वास्तूबद्दल भावना व्यक्त करताना राजेंद्र खातू म्हणाले, चिपळूण नगर परिषदेच्या या सुंदर, कलात्मक आणि ऐतिहासिक वास्तूने आम्हाला घडवले, ज्ञान दिले आणि आयुष्याला नवी दिशा दिली. येथील प्रत्येक खोली, लाकडी जिना आणि भिंतींमध्ये आमच्या अनमोल आठवणी जपल्या आहेत.”
“नवीन वास्तू उभी राहील; मात्र या ऐतिहासिक इमारतीशी जोडलेले ऋणानुबंध आणि तिच्या देखण्या रचनेच्या आठवणी कायम हृदयात राहतील,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या वास्तूने अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवाप्रवासाचे साक्षीदार होत नगरपरिषदेच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावली. येथील प्रत्येक विभाग, लाकडी जिना आणि भिंती कर्मचाऱ्यांच्या कार्याची आणि योगदानाची आठवण करून देतात.
नवीन प्रशासकीय इमारत उभी राहणार असली, तरी जुन्या वास्तूशी जुळलेले भावनिक नाते कायम राहील, अशी भावना माजी व विद्यमान अधिकारी-कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. अनेक वर्षांच्या आठवणींचा ठेवा जपणाऱ्या या ऐतिहासिक वास्तूला निरोप देताना अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मनात कृतज्ञता आणि हुरहूर दाटून आली आहे.




