अतिक्रमणविरोधी मोहीम गणेशोत्सवापुरती थांबणार, बैठकीत निर्णय


रत्नागिरी शहरातील मुख्य रस्ते आणि फूटपाथवरील तात्पुरती अतिक्रमणे हटवण्यासाठी नगर परिषदेतर्फे सुरू करण्यात आलेली धडक मोहीम आता आगामी गणेशोत्सवानंतर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या मुख्य उपस्थितीत नगराध्यक्ष, नगरसेवक आणि नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकार्‍यांची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत गणेशोत्सवाचा काळ विचारात घेऊन ही मोहीम उत्सव संपेपर्यंत स्थगित ठेवण्यावर एकमत झाले.
शहरात प्रस्तावित नवीन विकासकामांच्या ठिकाणी होणारी बेकायदेशीर खोके, टपर्‍या आणि हातगाड्यांची अतिक्रमणे हटवण्यासाठी प्रशासनाने ही कारवाई हाती घेतली होती. सुरुवातीला व्यापार्‍यांना स्वतःहून अतिक्रमणे हटवण्याचे आवाहन करण्यात आले होते. ज्यांनी प्रतिसाद दिला नाही, त्यांच्यावर सलग तीन दिवस पोलीस बंदोबस्तात कडक कारवाई करत टपर्‍या जप्त करण्यात आल्या होत्या. मात्र, गणेशोत्सव हा कोकणातील सर्वांत मोठा सण असल्याने या काळात कारवाई थांबवावी, अशी विनंती टपरीधारक व फेरीवाल्यांनी लोकप्रतिनिधीकडे केली होती. हा सामाजिक दृष्टिकोन विचारात घेऊन सण संपेपर्यंत कारवाई स्थगित ठेवण्यात आली आहे. गणेशोत्सव संपताच ही मोहीम पुन्हा जोरदार राबवली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button