
जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिकेचा शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या मंत्र्यांनी केला तीव्र शब्दांत निषेध
मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिकेचा शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या मंत्र्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. शिंदे हे समाजात भांडणे लावत असून दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास तेच जबाबदार राहतील, या जरांगेंच्या विधानाचा समाचार घेत शिवसेनेचे नेते उदय सामंत, शंभूराज देसाई आणि गुलाबराव पाटील यांच्यासह प्रमुख मंत्र्यांनी जरांगे यांच्यावर जोरदार पलटवार केला.यापुढेही जरांगे पाटील यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले जाणार आहे.
जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेली टीका मराठा समाजाला पसंत पडलेली नाही. मराठा समाजाच्या प्रश्नांवर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. अशा प्रकारची टीका समाजाला रुचणारी नाही, असे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी, आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न मांडणे आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप करणे यात फरक असल्याचे म्हणत, जरांगे यांना राजकारण करायचे असेल तर आम्हीही त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा दिला.मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने नोंदणी प्रमाणपत्र दिले जात नाहीत, असा अपप्रचार केला जात आहे. जरांगे यांचे पाठीराखे असतील तर आम्हीही शिंदे यांचे पाठीराखे आहोत, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. सरकारकडून संबंधित प्रक्रिया राबवली जात आहे. वस्तुस्थितीची माहिती न घेता सरकारविरोधात वातावरण निर्माण केले जात असल्याचे सामंत यांनी सांगितले.पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनीही जरांगे यांच्या भूमिकेवर टीका केली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि निर्णय घेणाऱ्या व्यक्तींवरच जरांगे शिवीगाळ करीत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने घेतलेल्या भूमिकेचा विचार न करता केवळ टीका करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. महायुती सरकारने मराठा समाजासाठी विविध सोयी-सुविधा आणि योजना उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असतानाही मराठा समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने सहकार्याची भूमिका घेतली आहे. जरांगे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर चर्चेतून तोडगा काढण्याची शिंदे यांची भूमिका राहिली असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.




