
अडखळ येथे घरफोडी अज्ञाताविरोधात गुन्हा
दापोलीः- अडखळ येथील जुईकर मोहल्ला परिसरात घरफोडी करून अज्ञात चोरटयांनी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 1 लाख 66 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैरोजा अब्दुल रहीम वाकणकर (वय 57, व्यवसाय गृहिणी) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी त्यांच्या घरातील बेडरूममध्ये असलेल्या लाकडी पलंगाच्या कप्प्यात रोख रक्कम व सोन्याचे दागिने ठेवले होते. 10 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी परिसरात शोध घेतला असता ऐवज मिळून आला नाही. चोरीस गेलेल्या ऐवजात 16 हजार रूपयांची रोख रककम तसेच विविध वजनाचे सोन्याचे दागिने, अंगठया, कानातील दागिने आणि सोन्याच्या वस्तूंचा समावेश आहे. या सर्व ऐवजाची एकूण किंमत 1 लाख 66 हजार रूपये असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.
या चोरीबाबत वाकणकर यांनी शेजाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार अज्ञात चोरटयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल संतोष सडकर करत आहेत.




