रात्रीच्या अंधारात पालकमंत्री उदय सामंत दुचाकीवरून पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर!

चिपळूण : मंत्री म्हटले की गाड्यांचा ताफा आणि लवाजमा असे चित्र सर्वसाधारणपणे पाहायला मिळते. मात्र, रत्नागिरीचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रात्रीच्या अंधारात चक्क दुचाकीवरून प्रवास करत चिपळूण तालुक्यातील गोवळकोट येथे शेतकऱ्यांचा बांध गाठला. शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने त्यांनी दुचाकीवरून प्रवास करण्याचा पर्याय निवडला. त्यांच्या या कृतीची परिसरात चर्चा रंगली.

चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या पुढाकारातून गोवळकोट येथे शेतकरी बांधवांसाठी बियाणे आणि विळ्यांचे वाटप करण्यात आले. काही दिवसांपूर्वी सकपाळ यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी फराळाचा आनंद घेतला होता. त्यावेळी शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्याचा शब्द त्यांनी दिला होता. त्यानुसार आयोजित उपक्रमात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ४०० शेतकऱ्यांना बियाणे व विळ्यांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी शेतापर्यंत जाणारा रस्ता नसल्याने पालकमंत्री सामंत यांनी दुचाकीवरून प्रवास करत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचण्यास प्राधान्य दिले. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून शेतकऱ्यांप्रती सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. लाभार्थी शेतकऱ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत पालकमंत्री उदय सामंत, नगराध्यक्ष उमेश सकपाळ आणि चिपळूण शिवसेनेचे आभार मानले.

या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर, चिपळूण नगर परिषदेचे बांधकाम समिती सभापती कपिल शिर्के, गटनेते अंकुश आवले, नगरसेविका हर्षाली पवार, समाजकल्याण समिती सभापती मनाली जाधव, नगरसेविका पल्लवी महाडिक, गुहागर विधानसभा मतदारसंघाचे तालुकाप्रमुख रुपेश घाग, चिपळूण तालुकाप्रमुख दिलीप चव्हाण यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शेतकरी, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्यासह त्यांना प्रत्यक्ष मदत करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची गोवळकोट परिसरात चर्चा सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button