
देवाचे गोठणे येथे माता-भगिनी व ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी सवलत स्मार्ट कार्ड शिबिर
शिवसेना साखरी-नाटे विभागाचा पुढाकार; २१ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत सभागृहात आयोजन
राजापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासात महिला, मुली आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलतीचा लाभ घेणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी शिवसेना राजापूर तालुका व साखरी-नाटे विभागाच्या वतीने देवाचे गोठणे येथे विशेष स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. देवाचे गोठणे विभागातील माता-भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, शनिवारी, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत ग्रामपंचायत सभागृह, देवाचे गोठणे येथे हे शिबिर पार पडणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे राजापूर तालुकाप्रमुख दीपक नागले, तालुका संपर्कप्रमुख भास्कर चव्हाण, राजापूर तालुका सभापती सौ. नंदिनी कदम, जिल्हा परिषद सदस्य सौ. कोमल नवाळे, पंचायत समिती सदस्य सौ. स्पृहा गुरव, विभागप्रमुख विनोद शेलार तसेच ज्येष्ठ शिवसैनिक संजय नाटेकर आणि शैलेंद्र शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या प्रवाशांना मिळणार सवलतीचा लाभ
या स्मार्ट कार्डच्या माध्यमातून वयाची १२ वर्षे पूर्ण झालेल्या मुली व महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत, तर वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या पुरुषांना ५० टक्के सवलत मिळणार आहे. तसेच ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात १०० टक्के सवलत मिळणार आहे.
स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी लाभार्थ्यांनी आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच नोंदणीसाठी संबंधित व्यक्तीने स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक आहे. नोंदणीनंतर साधारण ३० दिवसांच्या कालावधीत स्मार्ट कार्ड उपलब्ध होणार आहे.
या शिबिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आनंदा तिलोंटकर, प्रभाकर नवाळे, नितीन जाधव आणि युवासेनेचे पदाधिकारी सांभाळणार आहेत. तर राजू भारती, निलेश नवाळे, केरू परवडी (शाखाप्रमुख) यांच्यासह महिला व पुरुष उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, बूथप्रमुख आणि सर्व शिवसैनिकांनी या शिबिराच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे.
देवाचे गोठणे विभागातील सर्व माता-भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन एसटी प्रवास सवलत स्मार्ट कार्डचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना साखरी-नाटे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.




