
हर्णे समुद्रकिनारी दुर्मिळ ‘झेब्रा अर्चिन क्रॅब’चे दर्शन
दापोली तालुक्यातील हर्णे समुद्रकिनारी झेब्रासारख्या काळ्या-पांढऱ्या पट्ट्यांनी नटलेला दुर्मिळ आणि आकर्षक समुद्री खेकडा आढळून आला आहे. प्राथमिक निरीक्षणानुसार या खेकड्याची ओळख ‘झेब्रा अर्चिन क्रॅब’ अशी करण्यात आली आहे. या नोंदीमुळे हर्णे परिसरातील सागरी जैवविविधतेच्या अभ्यासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
समुद्री जैवविविधतेचे अभ्यासक फहाद जमादार यांनी नियमित सागरी निरीक्षणादरम्यान हर्णेच्या खडकाळ किनाऱ्यावर या वैशिष्ट्यपूर्ण खेकड्याचे छायाचित्रण केले. आकाराने लहान असलेल्या या खेकड्याच्या शरीरावरील काळे-पांढरे पट्टे तसेच पायांवरील आकर्षक रंगसंगतीमुळे तो विशेष लक्षवेधी ठरला.
‘अर्चिन क्रॅब’ म्हणून ओळखला जाणारा हा खेकडा समुद्री अर्चिन या काटेरी सागरी जीवाच्या काट्यांमध्ये वास्तव्य करण्यासाठी ओळखला जातो. या दोन्ही जीवांमध्ये सहजीवी संबंध आढळत असल्याचे समुद्री जीवशास्त्राच्या अभ्यासातून दिसून येते. मात्र, हर्णे येथे करण्यात आलेल्या निरीक्षणावेळी खेकडा आणि समुद्री अर्चिन एकाच परिसरात स्वतंत्रपणे आढळून आले. त्यामुळे या ठिकाणी दोघांमध्ये प्रत्यक्ष सहजीवी संबंध असल्याचे सध्या निश्चितपणे सांगता येत नाही.
हर्णे किनाऱ्यावर झालेली झेब्रा अर्चिन क्रॅबची ही नोंद सागरी जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात असून, या परिसरातील सूक्ष्म समुद्री जीवसृष्टीचा अधिक सखोल अभ्यास करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.




