चिपळूण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर; मंत्रिमंडळ उपसमितीची मान्यता

राज्यातील आणखी चार तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश; चिपळूणमधील पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांना मिळणार बळ

चिपळूण : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यासह आणखी चार तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यास मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसमितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, तसेच पालघर जिल्ह्यातील वाडा आणि विक्रमगड या चार तालुक्यांचा नव्याने दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी राज्यातील ३०४ तालुके दुष्काळग्रस्त यादीत होते. नव्या निर्णयामुळे ही संख्या ३०८ वर पोहोचली आहे.

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली आहे. टँकरमुक्तीसाठी १३ तालुक्यांतील २१२ योजनांसाठी ८३.१८ कोटी रुपये, तर नळपाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, गडहिंग्लज, कागल आणि करवीर यांसह अन्य तालुक्यांच्या फेरसर्वेक्षणाचा अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात आणखी काही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश होण्याची शक्यता आहे.

चिपळूण तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाल्याने पाणीटंचाई निवारण आणि आवश्यक उपाययोजनांच्या अंमलबजावणीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button