
खासगी शाळांसाठी नवा कायदा, वसतिगृह भत्ता वाढणार; शिक्षण क्षेत्रासाठी 5 मोठे निर्णय
शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. वैद्यकीय आणि आरोग्य विज्ञान अभ्यासक्रम घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृह निर्वाह भत्त्यात वाढ करण्यापासून खासगी अनुदानित शाळांच्या नियमनासाठी स्वतंत्र कायद्याचे प्रारूप तयार करण्यापर्यंत अनेक विषयांना राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील आर्थिक सुविधा, प्रशासकीय कामकाज आणि वेतन संरचनेत बदल होणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. यामध्ये उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण तसेच शालेय शिक्षण विभागाशी संबंधित प्रस्तावांचा समावेश आहे.
वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेत वाढ
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने घेतला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचे सुधारित दर लागू करण्यास मान्यता देण्यात आली. ईबीसी, एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील आरोग्य विज्ञान व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. भोजन, निवास आणि दैनंदिन खर्चासाठी मिळणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ झाल्याने विद्यार्थ्यांचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल.




