
गणपतीपुळे मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरील घंटा चोरीप्रकरणी अटक
कोल्हापुरातील हातकणंगले येथून संशयित ताब्यात
रत्नागिरी : गणपतीपुळे देवस्थानच्या मंदिर प्रदक्षिणा मार्गावरील दोन पितळी घंटा चोरीप्रकरणी जयगड पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथून संशयिताला अटक केली. संतोष मारुती मकदुम (४४, रा. शाहुवाडी, हातकणंगले, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे.
गुरुवारी (ता. १९) सायंकाळी पाच ते सहा या वेळेत प्रदक्षिणा मार्गावरील तळ्याजवळील फायबर शेडच्या लोखंडी बारला साखळीने बांधलेली तीन किलो वजनाची, १२ हजार रुपये किमतीची घंटा चोरीला गेली. तसेच प्रदक्षिणा मार्गाच्या पूर्वेकडील उतारावर असलेल्या ‘देवळी’ येथे लोखंडी रॉडला अडकवलेली एक किलो वजनाची, चार हजार रुपये किमतीची दुसरी घंटाही चोरट्याने लंपास केली.
या चोरीप्रकरणी नीलेश श्रीकृष्ण कोल्हटकर (४९, रा. गणपतीपुळे) यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू असताना पोलिसांनी संशयिताला हातकणंगले येथून अटक केली.




