
�जात पडताळणीसाठी कार्यालयांचे खेटे संपणार; अर्ज, सुनावणी अन् प्रमाणपत्रही ऑनलाइन मिळणार! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थी आणि नागरिकांना आता वारंवार जात पडताळणी समितीच्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही. जात प्रमाणपत्र पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
अर्ज दाखल करण्यापासून कागदपत्रांची पडताळणी, सुनावणी आणि प्रमाणपत्र मिळविण्यापर्यंतची प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. विशेष म्हणजे, जात वैधता प्रमाणपत्र थेट व्हॉट्सॲप आणि ई-मेलवर उपलब्ध करून देण्याची सुविधाही या प्रणालीत असणार आहे.
राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने आज (बुधवारी) यासंदर्भातील शासन परिपत्रक जारी केले आहे. शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती, नोकरी, निवडणूक आणि विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. मात्र, हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अनेकदा विद्यार्थी आणि नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपूर्ण प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (TCS) सहकार्याने ‘कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी इन्फॉर्मेशन सिस्टीम’ (CCVIS) ही नवीन डिजिटल प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी यापुढे केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे. अन्य मार्गाने केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे, दस्तऐवजी पुरावे आणि शपथपत्रांच्या मूळ किंवा प्रमाणित प्रती स्कॅन करून अपलोड कराव्या लागणार आहेत. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्याची प्रिंट काढून पुन्हा समितीच्या कार्यालयात जमा करण्याची आवश्यकता राहणार नाही.
आधार क्रमांकाशी जोडणार अर्ज; एकदाच करता येणार अर्ज
जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज संबंधित अर्जदाराच्या आधार क्रमांकाशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जदाराला एकच अर्ज दाखल करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज भरताना आणि कागदपत्रे अपलोड करताना विशेष काळजी घेण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत.
जातीच्या नोंदीचा आणि निर्धारित मानीव दिनांकापूर्वीच्या रहिवासाचा प्रत्येकी किमान एक दस्तऐवजी पुरावा सादर करावा लागणार आहे. असा पुरावा सादर करणे शक्य नसल्यास स्वयंघोषणापत्र सादर करता येणार आहे. मात्र, आवश्यकतेनुसार समितीला अतिरिक्त पुरावे मागविण्याचा अधिकार असेल.
घरबसल्या होणार सुनावणी; AI चॅटबॉटही करणार मदत
जात पडताळणीच्या प्रक्रियेत अर्जदाराची सुनावणी घेण्याची आवश्यकता असल्यास ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाइन घेतली जाणार आहे. केवळ विशिष्ट आणि अपवादात्मक प्रकरणांमध्ये बार्टीच्या महासंचालकांच्या परवानगीने प्रत्यक्ष सुनावणी घेता येणार आहे.
अर्जदारांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित चॅटबॉटची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अर्जाची सद्यस्थिती ऑनलाइन तपासता येणार असून, अर्जातील त्रुटींची माहिती एसएमएस, व्हॉट्सॲप आणि ई-मेलद्वारे दिली जाणार आहे.
शक्यतो ६० दिवसांत होणार निर्णय
जात पडताळणी समितीने अर्जदाराच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत शक्यतो ६० दिवसांच्या आत निर्णय घ्यावा, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत. समितीचा निर्णय अर्जदाराला एसएमएस, व्हॉट्सॲप किंवा ई-मेलद्वारे कळविण्यात येणार आहे.
अर्जामध्ये त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासाठी पुढील दोन महिने अर्जदाराला ऑनलाइन माध्यमातून सूचना दिल्या जातील. पाचव्या महिन्यात त्रुटींची पूर्तता करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अंतिम सुनावणीची संधी दिली जाईल. त्यानंतरही अर्जदाराने प्रतिसाद दिला नाही किंवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली नाही, तर संबंधित प्रकरण निकाली काढण्यात येणार आहे.
सुनावणीची संधी दिल्याशिवाय दावा अवैध ठरवता येणार नाही!
अर्जदाराने सादर केलेल्या पुराव्यांबाबत शंका असल्यास समिती संबंधित प्रकरण दक्षता पथकाकडे चौकशीसाठी पाठवू शकते. आवश्यकतेनुसार अर्जदाराला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात येणार आहे.
मात्र, अर्जदाराला आपली बाजू मांडण्याची वाजवी संधी आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीची संधी दिल्याशिवाय समितीला जातीचा दावा अवैध ठरविता येणार नाही. जातीचा दावा अवैध ठरविताना समितीला कारणांसह आदेश जारी करावा लागणार आहे.
निवडणूक लढविणाऱ्यांना किती शुल्क भरावे लागणार?
जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया ऑनलाइन करतानाच राज्य सरकारने सेवा शुल्कामध्येही सुधारणा केली आहे. शैक्षणिक प्रयोजनासाठी जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ५०० रुपये, तर महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी एक हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. नोकरी आणि अन्य निर्धारित शासकीय प्रयोजनांसाठीही एक हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
जात वैधता प्रमाणपत्रासाठी किती शुल्क?
प्रयोजन – सेवा शुल्क
शैक्षणिक – १०० रुपये
ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक – ५०० रुपये
महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक – १,००० रुपये
सेवाविषयक प्रयोजन – १,००० रुपये
शासकीय योजना व सवलतींसाठी वैधता प्रमाणपत्र बंधनकारक असल्यास – १,००० रुपये
अर्ज कुठे करायचा?
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विकसित करण्यात आलेली नवीन ऑनलाइन प्रणाली https://www.cvc.barti.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रणालीमुळे विद्यार्थी, नोकरीसाठी प्रयत्न करणारे उमेदवार, निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवार आणि नागरिकांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.




