
वाटद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी २.५० कोटींचा निधी; २८ नोव्हेंबर रोजी भूमिपूजन
रत्नागिरी, दि. २४ ) : ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार व सुलभ आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटद येथील मुख्य इमारतीच्या नवीन बांधकामासाठी शासनाकडून रु. २.५० कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नांतून हा निधी मंजूर झाला असून, नवीन इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा शनिवार, दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पार पडणार आहे.
वाटद प्राथमिक आरोग्य केंद्र सन १९८४-८५ पासून कार्यरत असून, परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना या केंद्राद्वारे प्राथमिक आरोग्य सेवा दिल्या जातात. मात्र, अनेक वर्षे उलटल्याने ही इमारत जुनी झाली असून सद्यस्थितीत मोडकळीस आलेली आहे. इमारतीच्या काही भागाची किरकोळ पडझड झाल्याची बाब समोर आल्यानंतर आरोग्य विभागाने याची गांभीर्याने दखल घेतली.
रुग्ण, नागरिक तसेच आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने इमारतीचे सविस्तर स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्या अहवालानुसार आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून सदर इमारत पाडण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगीही घेण्यात आली आहे.
ग्रामीण आरोग्य सेवेला मिळणार नवे बळ
नवीन इमारतीसाठी आरोग्य विभागाने केलेल्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी विशेष पुढाकार घेतल्याने २.५० कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे बांधकाम मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला असून, नागरिकांना अधिक सुरक्षित व सुसज्ज आरोग्य संस्था उपलब्ध होणार आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून खालील सेवा पुरविल्या जातात
- बाह्यरुग्ण सेवा व आवश्यक प्राथमिक उपचार
- माता व बाल आरोग्य सेवा आणि लसीकरण
- संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध व नियंत्रण
- राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी व आरोग्यविषयक जनजागृती
नव्या इमारतीमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अधिक सोयीस्कर सुविधा मिळतील, तसेच आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि अनुकूल वातावरणात काम करता येईल.
शासनाच्या प्राधान्याचा महत्त्वपूर्ण टप्पा
ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा देण्यासाठी राज्य शासन इमारतींचे नूतनीकरण, नवीन उभारणी, वैद्यकीय उपकरणे, मनुष्यबळ आणि सेवेचा दर्जा उंचावण्यावर भर देत आहे. वाटदच्या नवीन इमारतीसाठीचा हा २.५० कोटींचा निधी ग्रामीण आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
जिल्हा परिषद रत्नागिरीच्या आरोग्य विभागामार्फत नवीन इमारतीच्या बांधकामासंदर्भातील पुढील कार्यवाही केली जात असून, हा प्रकल्प परिसरातील आरोग्य सुविधांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरेल.




