
संघटनात्मक बळकटीकरणासाठी खेड भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न
जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती; पक्षविस्तारासह शहर व तालुक्यातील विकासकामांवर चर्चा

खेड : भारतीय जनता पार्टीच्या खेड उत्तर मंडल व खेड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने संघटनात्मक बळकटीकरण, पक्षविस्तार आणि शहरासह तालुक्यातील विविध विकासकामांच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. खेड येथील बौद्ध समाज संघ सभागृहात आयोजित या बैठकीला भाजपा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे आणि भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या बैठकीत पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, आगामी काळातील पक्षाची राजकीय दिशा आणि कार्यपद्धती निश्चित करणे, तळागाळातील कार्यकर्त्यांशी समन्वय वाढविणे, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे, यासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. याशिवाय खेड शहर व ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्न, नागरिकांच्या समस्या आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विकासकामांबाबतही विचारविनिमय करण्यात आला.
भाजपा जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संघटनात्मक कामाला अधिक गती देण्याचे आवाहन केले. पक्षाची खरी ताकद कार्यकर्त्यांच्या एकजुटीत आणि सातत्यपूर्ण जनसंपर्कात आहे. त्यामुळे प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सक्रिय राहून पक्षाचे कार्य अधिक व्यापक करावे, असे त्यांनी सांगितले.
भाजपा नेते ॲड. वैभव खेडेकर यांनी खेड शहर व तालुक्याच्या विकासासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संघटितपणे व समन्वयाने काम करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवणे, त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्या सोडविण्यासाठी प्रभावीपणे पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, तालुका उपाध्यक्ष मनोज गायकवाड, खेड शहराध्यक्ष भालचंद्र ऊर्फ नंदू साळवी, उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, खेड पंचायत समितीचे माजी सभापती विजयराव कदम, भाजपा अल्पसंख्याक सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक व गटनेते रहीम सहिबोले, नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, नगरसेविका स्वप्नाली राकेश चव्हाण, भाजपा ट्रान्सपोर्ट सेलचे उत्तर रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष तथा जिल्हा कार्यकारिणी सदस्य निलेश बामणे, खेड तालुका प्रभारी विजय दरेकर, महिला मोर्चाच्या खेड शहर उपाध्यक्ष प्रीती चिखले, शहर शक्तीकेंद्र प्रमुख वैजेश सागवेकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विशाल होळकर, शहराध्यक्ष स्वराज गांधी, शहर उपाध्यक्ष राहुल पाटणे, भाजपा प्रणित रिक्षा सेलचे तालुकाध्यक्ष राजन खेडेकर, रिक्षा युनिटचे खेड उपतालुकाध्यक्ष तुषार पवार, ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष प्रथमेश सुर्वे यांच्यासह विविध आघाड्यांचे पदाधिकारी, महिला मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीच्या माध्यमातून खेडमध्ये भाजपाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासह आगामी काळात जनसंपर्क आणि विकासकामांच्या पाठपुराव्याला अधिक गती देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.



