वीर–देवपाठ रस्त्याच्या कामाला अखेर हिरवा कंदील; १ कोटी २० लाखांचा कार्यारंभ आदेश जारी!

जि.प. सदस्या शिवानी सावंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; वीर, रानपाट, लोहारवाडी, देवपाठ ग्रामस्थांना दिलासा

चिपळूण : वीर–देवपाठ परिसरातील अनेक गावांसाठी महत्त्वाच्या असलेल्या रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चिपळूण कार्यालयाकडून या रस्त्याच्या कामासाठी ठेकेदाराला कार्यारंभ आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या रस्त्याच्या मजबुतीकरण आणि डांबरीकरणाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा परिषद सदस्या तथा स्थायी समिती सदस्या शिवानी संदीप सावंत यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

वीर, रानपाट, लोहारवाडी आणि देवपाठ या गावांच्या दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. या रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष काम सुरू होण्यास विलंब होत होता. ही बाब लक्षात घेऊन शिवानी सावंत यांनी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित केला. तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडेही सातत्याने पाठपुरावा केला.

पालकमंत्री उदय सामंत यांनी या प्रश्नाची दखल घेत संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यारंभ आदेश निर्गमित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चिपळूण कार्यालयाने २६ ऑक्टोबर २०२६ रोजी कार्यारंभ आदेश जारी केला आहे.

या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी १ कोटी ७५ लाख १४ हजार ४८८ रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या कामाची स्वीकृत किंमत १ कोटी २० लाख ८७ हजार ७४८ रुपये ६८ पैसे निश्चित करण्यात आली आहे. करारानुसार पावसाळ्यासह १२ महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्ण करणे अपेक्षित आहे.

कार्यारंभ आदेश मिळाल्याने लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. मात्र, रस्त्याचे काम केवळ सुरू होणे पुरेसे नसून ते दर्जेदार आणि निर्धारित मुदतीत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर आपण बारकाईने लक्ष ठेवणार असल्याचे शिवानी सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

अनेक वर्षांपासून रस्त्याच्या सुधारणेची प्रतीक्षा करणाऱ्या वीर, रानपाट, लोहारवाडी आणि देवपाठ परिसरातील ग्रामस्थांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला असून ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button