
अधिकाऱ्यांनी कार्यालयात न बसता थेट फिल्डवर उतरून कामे मार्गी लावावीत; राज्यमंत्री योगेश कदम यांच्या सक्त सूचना
मंडणगड येथे जलजीवन मिशन नळपाणी योजना व संभाव्य दुष्काळ निवारण आढावा बैठक

रत्नागिरी, दि. २५ ) : “केवळ कार्यालयात बसून कागदी घोडे नाचवणे बंद करा आणि थेट फिल्डवर उतरून प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावा. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही; केवळ बदली न करता थेट कठोर आणि दंडात्मक कारवाई केली जाईल,” अशा सक्त शब्दांत ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांनी सूचना दिली. पंचायत समिती मंडणगड येथील राजमाता जिजाऊ सभागृहात आयोजित ‘जलजीवन मिशन नळपाणी योजना आणि संभाव्य पाणीटंचाई आढावा बैठकीत’ ते बोलत होते.
या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता केंद्रे, पंचायत समिती मंडणगडच्या सभापती प्रणाली चिले, उपसभापती दीपक मालुसरे, तहसीलदार अक्षय ढाकणे, गटविकास अधिकारी राजेंद्र आंधळे यांच्यासह ग्रामसेवक आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रलंबित १४ योजना १५ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश
या बैठकीत राज्यमंत्री श्री कदम यांनी मंडणगड तालुक्यातील एकूण १४ नळपाणी योजनांचा सविस्तर आढावा घेतला. ज्या योजनांची कामे ७५ ते १०० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली आहेत, मात्र केवळ किरकोळ तांत्रिक कारणांमुळे किंवा एमएसईबीच्या प्रलंबित जोडणीमुळे त्या कार्यान्वित होऊ शकलेल्या नाहीत, अशा योजनांची कामे पुढील १४ ते १५ दिवसांत युद्धपातळीवर पूर्ण करून नागरिकांना पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले. तालुक्यातील १०५ गावांमधील पाण्याच्या प्रश्नांबाबत आणि प्रलंबित योजनांबाबत अधिकाऱ्यांकडे अद्ययावत माहिती नसल्याने तसेच जागेवर जाऊन पाहणी केली जात नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यापुढे १४ ही योजनांच्या कामांचा दैनंदिन अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले.
संभाव्य दुष्काळासाठी लहान टँकर व जलस्रोतांचे नियोजन
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आगामी काळात तालुक्यात तीव्र पाणीटंचाई आणि दुष्काळाचे संकट उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने आत्तापासूनच सज्ज राहावे, असे निर्देश त्यांनी दिले. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापासूनच टँकरची मागणी वाढू शकते, त्यामुळे डोंगराळ आणि दुर्गम वाड्या-वस्त्यांवर पाणी पोहोचवण्यासाठी मोठ्या टँकरऐवजी लहान टँकरची मागणी नोंदवावी तसेच स्वतंत्र टँकर खरेदीसाठी तात्काळ प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना त्यांनी केल्या. याशिवाय, तालुक्यातील शासकीय आणि खासगी जलस्रोतांची (विहिरी, बोरवेल) आत्ताच पाणी तपासणी करून आवश्यकतेनुसार खाजगी स्रोतांचे अधिग्रहण करण्याचे नियोजन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वनराई बंधारे व नागरिक निवेदनांचा आढावा
तालुक्यात बांधण्यात आलेल्या ३१० वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून किती जलस्रोतांचे बळकटीकरण झाले याचा आढावा घेतानाच, नादुरुस्त बंधारे आणि पाण्याच्या चेंबर्सच्या दुरुस्तीचे टप्प्याटप्प्याने इस्टिमेट तयार करून कामे हाती घेण्याचे आदेश दिले. तसेच, तालुक्यातील नागरिकांकडून प्रशासनाकडे किती निवेदने प्राप्त होतात आणि त्यावर प्रत्यक्ष काय कारवाई केली जाते, याचा सविस्तर अहवाल पुढील काही दिवसांत सादर करण्याच्या सक्त सूचनाही श्री कदम यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.




