गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक; चिपळूणजवळ ४० बॉक्स दारूसह इनोव्हा जप्त, ७ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत!


राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चिपळूण पथकाने शहरानजीकच्या कळंबस्ते गावच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर कारवाई करत गोवा बनावटीच्या विदेशी दारूची वाहतूक उधळून लावली.

या कारवाईत ४० बॉक्स म्हणजेच ३४५.६० बल्क लिटर विदेशी दारूसह टोयोटा इनोव्हा गाडी असा एकूण ७ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेली आणि केवळ गोवा राज्यात विक्रीस परवानगी असलेली विदेशी दारू वाहून नेली जाणार होती. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून कारवाई केली.

या कारवाईदरम्यान टोयोटा कंपनीची इनोव्हा गाडी (क्र. एमएच ०४ ई एच ४६५६) पकडण्यात आली. गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये गोवा निर्मित विदेशी दारूचे ४० बॉक्स आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत ४ लाख ८० हजार रुपये, तर इनोव्हा गाडीची किंमत ३ लाख रुपये असल्याचे विभागाने सांगितले.

आरटीओ नोंदणीनुसार या गाडीचा मालक संकेत पि. पांडुरंग राठोड (वय ३२, रा. चव्हाणवाडी, पो. हनेगाव, ता. देगलूर, जि. नांदेड) असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, कारवाईनंतर संबंधित इसम फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ मधील कलम ६५ (अ), (ई) आणि ९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुनील आरडेकर, दुय्यम निरीक्षक संजय मालुसरे, जवान वैभव सोनावले, शुभम काडापुरे, मयूर पुरीबुवा तसेच जवान-नि-वाहनचालक विशाल विचारे यांनी ही कारवाई केली. गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक सुनील आरडेकर करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button