नांदिवसे येथे १ डिसेंबर रोजी श्री कालभैरव जन्मोत्सव सोहळा

चिपळूण (प्रतिनिधी):-तालुक्यातील मौजे नांदिवसे येथील ग्रामदैवत श्री कालभैरव यांचा सालाबादप्रमाणे जन्मोत्सव सोहळा मंगळवार, दि. १ डिसेंबर २०२६ रोजी मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त श्री कालभैरव मंदिरात सोमवार, दि. ३० नोव्हेंबर आणि मंगळवार, दि. १ डिसेंबर असे दोन दिवस विविध धार्मिक, आध्यात्मिक आणि भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शालिवाहन शके १९४८, कार्तिक कृष्ण पक्ष कालाष्टमीच्या पावन पर्वावर होणाऱ्या या उत्सवासाठी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

सोमवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी स्थापित देवतांचे पूजन करण्यात येणार आहे. सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत अभिषेक व हवन, तर दुपारी १ ते २ या वेळेत श्री सत्यनारायण महापूजा, तीर्थप्रसाद व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी हरिपाठ होईल. रात्री ९ वाजता श्री जानाईदेवी व श्री वाघजाईदेवी मंदिरातून अबदागिरी आणि निशाण यांचे आगमन होणार असून, त्यानंतर ग्रामस्थांचे भजन होईल. पहाटे काकड आरतीने धार्मिक कार्यक्रमांची सांगता होईल.

मंगळवार, दि. १ डिसेंबर हा श्री कालभैरव जन्मोत्सवाचा मुख्य दिवस असून, सकाळी ९.३० ते ११ या वेळेत नवगणेश महिला भजन मंडळ, तिनवड-पिंपळी खुर्द यांचे भजन होणार आहे. सकाळी ११ ते १२ या वेळेत ग्रामस्थांचे भजन होईल. दुपारी ठीक १२ वाजता श्रींचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

त्यानंतर दुपारी १२.१५ ते १ या वेळेत श्री कालभैरव ध्यान, स्तोत्र, श्री कालभैरवाष्टकाचे पठण, ‘ॐ श्री कालभैरवाय नमः’ या तारकमंत्राचा सामूहिक जप, पाळणा आणि आरती असे भक्तिमय कार्यक्रम होतील. दुपारी १ ते ३ या वेळेत तीर्थप्रसाद व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री १० वाजता महाआरती आणि गजराने जन्मोत्सवाची सांगता होणार आहे.

श्री कालभैरव जन्मोत्सव हा नांदिवसे ग्रामस्थांसाठी श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा महत्त्वपूर्ण उत्सव आहे. या सोहळ्यानिमित्त सर्व भाविकांनी वेळेवर उपस्थित राहून श्रींचे दर्शन, तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. तसेच भक्तिभावाने या उत्सवात सहभागी होऊन सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन समस्त ग्रामस्थ, मौजे नांदिवसे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button